Pimpri: औद्योगिकनगरीतील कोरोना बाधितांचा आकडा दोन हजार पार

The number of corona victims in the industrial city has crossed two thousand

लॉकडाउन शिथिल केल्यानंतर महिन्याभरात 1762 नवीन रुग्णांची वाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा विळखा घट्ट होत असून बाधितांची संख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे. आज, मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत 81 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्ण संख्या 2027 झाली आहे. 10 मार्च ते 11 जून या 105 दिवसात औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे. शहराला रेडझोनमधून वगळून काल एक महिना पूर्ण झाला. रेडझोनमधून वगळल्यानंतर महिन्याभरात तब्बल 1762 नवीन रुग्णांची वाढ झाली.

राज्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात सापडला होता. 10 मार्च रोजी एकाचदिवशी शहरातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते.

त्यानंतर एप्रिलपासून रुग्ण वाढीचे प्रमाण वाढले. शहराला कोरोनाने अशरक्ष: विळखा घातला आहे. मागील काही दिवसांपासून दररोज रुग्ण सापडण्याचा उच्चांक होत आहेत. शहराच्या नवीन भागात रुग्ण सापडत आहेत.

शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दिवसाला 100 हून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. काल एकाचदिवशी दीडशे जणांना लागण झाली आहे.

कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी वाढताना दिसून येत आहे. कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. परिणामी, शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

मार्च, एप्रिल या दोन महिन्यात शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात होती. 10 मार्च ते 22 मे पर्यंत शहरातील रुग्ण संख्या 265 वर जाऊन पोहोचली होती.

त्यातच 22 मे रोजी शहराला रेडझोनमधून वगळले. रेडझोनमधून वगळल्याने महापालिकेने विविध सुविधा सुरु केल्या. बाजारपेठा, दुकाने, कंपन्या सुरु करत जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला.

परिणामी, रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली. नागरिकांकडून नियमांचे पालन होताना दिसून आले नाही. निर्बंध शिथिल करताच रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होवू लागली. ही रुग्ण वाढ सुरुच आहे.

रेडझोनमधून वगळून काल एक महिना पूर्ण झाला. या महिन्याभरात तब्बल 1762 नवीन रुग्ण सापडले आहेत. आत्तापर्यंत औद्योगिकनगरीतील रुग्ण संख्या 2027 वर पोहोचली आहे.

आज दुपारी चार वाजेपर्यंतच तब्बल 81 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्यने दोन हजाराचा टप्पा पार केला आहे. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

1181 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात, 811 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असली. तरी, त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. सक्रिय रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या जास्त आहे. आजपर्यंत 1181 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

आजमितीला 811 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी तब्बल 651 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. तर, 133 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असून 27 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, आजपर्यंत 35 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा ?

कोरोनाने तरुणांना विळखा घातला आहे. आत्तापर्यंत 22 ते 39 वय वर्ष असलेल्या शहरातील 812 युवकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे.

त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 525 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर 13 ते 21 वय वर्ष असलेल्या 257 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 214 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.

याशिवाय 60 वर्षापुढील 217 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.