Pimpri: सभागृह नेत्याचे ‘ते’ वक्तव्य अन् आजी-माजी महापौरांमध्ये खडाजंगी

एमपीसी न्यूज – पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. मात्र, काही नगरसेवक राजकीय स्टंटबाजी करीत आहेत. या सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या वक्तत्यावरुन महासभेत गदारोळ झाला. त्यांच्या वक्तव्याला माजी महापौर मंगला कदम, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आक्षेप घेतला. त्यांनी महापौरांकडे बोलून देण्याची विनंती केली असता महापौरांनी बोलून न देता उपसूचनांचा धडाका लावत सभा कामकाज रेटून नेले. त्यामुळे आजी-माजी महापौरांमध्ये खडाजंगी झाली. गणसंख्या अपुरी असताना केलेले सभाकामकाज बेकायदेशीर असल्याचा आरोप करत कदम यांनी महापौर जाधव यांचा निषेध केला.

महासभेच्या सुरुवातीला एक दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या निर्णयावर चार तास चर्चा झाली. सर्वात शेवटी बोलताना सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. मात्र काही नगरसेवक राजकीय स्टंटबाजी करीत आहेत.

सत्ता समिकरणे बदलण्याची चिन्हे दिसताच आम्ही कायपण करु, असे त्यांना वाटत आहे. त्यांच्या या वाक्याला माजी महापौर मंगला कदम, राहुल कलाटे यांनी आक्षेप घेतला. कलाटे बोलण्यासाठी उभा राहताच त्यांना महापौरांनी खाली बसण्यास सांगितले.

कदम यांनी जागेवर उभा राहून महापौरांना बोलून देण्याची विनंती केली. मात्र, महापौरांनी बोलून दिले नाही. महापौरांनी कदम यांना खाली बसण्यास सांगितले. तुम्ही आम्हाला आदेश द्यायचे नाहीत असे महापौरांनी त्यांना सुनावले. त्यावरुन दोघांमध्ये खडाजंगी झाली. कदम जागेवरच उभा राहिल्या. त्यांनी सभागृहात गणसंख्या अपूर्ण असल्याकडे महापौरांचे लक्ष वेधले. परंतु, तहकूब सभेला गणसंख्येची आवश्यकता नसल्याचे सांगत महापौर जाधव यांनी त्याकडे दुर्लक्ष करत कामकाज रेटून नेले.

उपसूचनांचा धडाका लावत ऑक्टोबर महिन्याच्या विषयपत्रिकेवरील विषयांना मान्यता दिली. तसेच नोव्हेंबर महिन्याच्या विषयपत्रिकेवरील विषय देखील मंजूर केले. कदम यांनी ही महासभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत महापौर जाधव यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.