Pimpri news: कोरोनाबाधितांचे प्राण वाचवण्यासाठी ‘प्लाझ्मा’ दान मोहीम राबवावी : अमित गोरखे

0

एमपीसी न्यूज – रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील हजारो कोरोनाबाधितांचा जीव संकटात सापडला आहे. त्यांना वाचवण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचे तुणतुणे वाजवत बसण्यापेक्षा आजपर्यंत कोरोनाबाधीत होऊन ठणठणीत बरे झालेल्या व्यक्तींचा प्लाझ्मा घेण्यासाठी पाऊले उचलावीत.

जेवढ्या अधिक प्रमाणात प्लाझ्मा घेतला जाईल, तेवढ्या अधिक प्रमाणात बाधितांचे जीव वाचवता येतील. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने युध्दपातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये दैनंदीन कोरोना विषाणुने संक्रमीत होणा-यांचे प्रमाण हजारोने वाढत आहे. आजरोजी शहरामध्ये एकूण 1 लाख 90 हजार 973 एवढ्या लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. त्यापैकी 1 लाख 65 हजार 246 लोकांनी कोरोना विषाणुवर यशस्वी मात केली आहे. त्यांच्या संपर्क क्रमांकासह इत्यंभूत माहिती पालिकेकडे नोंद आहे.

_MPC_DIR_MPU_II

तरी अशा व्यक्तींचा प्लाझ्मा का घेतला जात नाही ?. गेल्या कित्येक दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नसल्याच्या बातम्या माध्यमातून प्रसिध्द होत आहेत. काही रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या भावाने विक्री केली जात आहेत. तर काही रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शनच मिळत नसल्याचे अनुभव नागरिकांनी व्यक्त केले आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे कारण सांगत बसण्यापेक्षा आपण कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींचा प्लाझ्मा घेण्यासंदर्भात प्रशासकीय स्तरावर हालचाली का करत नाही ? असा सवाल अमित गोरखे यांनी उपस्थित केला आहे.

महापालिका प्रशासनाने कोरोनावर यशस्वी मात केलेल्या नागरिकांना संपर्क साधावा. प्लाझ्मा दान करण्यासाठी त्यांचे समुपदेशन करावे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करून कामाला लावावी. दैनंदीन प्लाझ्मा संकलनाची मोहीम हाती घेतल्यास रुग्णालयातील हजारो कोविड बाधितांना त्याचा उपयोग होईल. हजारो रुग्णांचे प्राण वाचतील. हे शक्य असताना पालिका प्रशासन यावर कसलीच भूमिका घेत नाही, हे आश्चर्यजनक आहे.

यातून प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे ?. प्रशासनाच्या अशा हलगर्जीपणामुळे अनेकांना रेमडेसिवीर इंजेक्शन घ्यावे की प्लाझ्मा घ्यावा, हेच कळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. प्लाझ्मा घेण्याची इच्छा असली तरी त्याचा सुध्दा तुटवडा निर्माण झालेला आहे. प्लाझ्मा हवा असल्याचे मॅसेजेस सोशल मीडियाद्वारे व्हायरल होत आहेत. नागरिकांना वाचवण्याकरिता प्लाझ्मा घेण्याची मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी गोरखे यांनी आयुक्त पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment