Omicron Variant : ‘ओमिक्रॉन’ कोरोना व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून सतर्कतेचा इशारा 

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरसने पुन्हा डोकं वर काढत दहशत पसरवायला सुरूवात केली आहे. ‘ओमीक्राॅन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेत संपुर्ण जग सतर्क झाले आहेत. अनेक देशांनी आपापल्या परीने उपाययोजना देखील सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारने सुद्धा नव्या विषाणूचे स्वरूप समजून घेत, त्यावर प्रभावी उपाययोजनांसाठी बैठकांचा धडाका लावला आहे. दरम्यान, आटोक्यात आलेल्या कोरोना संकटाला खीळ घालण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

नव्या व्हेरीयंटचा धोका टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या अंमलबजावणीसह काही तातडीची पावले उचलण्यात येत आहेत. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी (दि.27) वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. बैठकीदरम्यान, ‘ओमिक्रॉन’ विषाणू, त्याची लक्षणे, इतर देशांतील त्याचा दिसलेला प्रभाव यासंदर्भात चर्चा करण्यात आली, शिवाय भारतात याचा किती परिणाम होऊ शकतो याविषयी सुद्धा अंदाज वर्तवण्यात आला.

पंतप्रधान कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पंतप्रधानांनी या नव्या संकटावर चिंता व्यक्त करत संभाव्य धोक्याच्या अनुशंघाने नागरिकांनी सावधगीरी बाळगली पाहिजे, मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंग सोबतच इतरही खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान बाधित आणि धोका असणाऱ्या देशांवर लक्ष ठेऊन भारतात येणाऱ्या सर्वच आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांवर लक्ष ठेवणे, मार्गदर्शक तत्वानुसार चाचणी करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध फेरविचार करून त्याबाबत योग्य नियोजन करून त्याचा आढावा घेण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहे.

शनिवारी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आणखी एक बैठक पार पडली. या बैठकीत कोविड-19 साठी सार्वजनिक आरोग्य सज्जता, नवीन व्हेरिएंट आणि लसीकरण या गोष्टींबाबत महत्त्वपूर्ण आढावा घेण्यात आला. या बैठकीसाठी कॅबिनेट सचिव राजीव गौबा, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के.पॉल, आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव, भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजय राघवन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.