Pimpri News : क्रीडा क्षेत्रासाठी निधी कमी पडू देणार नाही – प्रा. उत्तम केंदळे

एमपीसी न्यूज – औद्योगिकनगरी बरोबरच क्रीडानगरी म्हणून देशात पिंपरी-चिंचवड शहराची ओळख निर्माण करायची आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे क्रीडा समितीचे सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी सांगितले.

आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार शहरातील विविध क्रीडा संघटनांची बैठक नुकतीच महापालिकेत झाली. क्रीडा समिती सदस्या शर्मिला बाबर, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, जुनि. टेक्नि. असि.गजेंद्र नागपुरे, क्रीडा पर्यवेक्षक अनिता केदारी, जयश्री साळवे, रंगराब कारंडे, महाकाळ आत्माराम, विश्वास गेंगजे, दत्तात्रय झिंजुर्डे, ॲथलेटिक्स संघटनेचे रामदास कुदळे, शेखर कुदळे, कराटे संघटनेचे खजिनदार अविनाश चंदनशिवे उपस्थित होते.

तसेच, कराटे संघटनेचे शहराध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी, योग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज काळे, बॉक्सिंग संघटनेचे प्रकाश काकडे, मनोहर इंगवले, डिटट्रीक बॅडमिंटन संघटनेचे सोनाजी गावडे, राजीव बाग, इकबाल शेख, किक बॉक्सिंग असोसिएशनचे संतोष म्हात्रे, आर्चरी असोसिएशन शहर सचिव सोनल बुंदेले आदी उपस्थित होते.

विविध क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींनी खेळाविषयी असलेल्या समस्या यावेळी मांडल्या. यामध्ये धनुर्विद्या या खेळासाठी गेली दहा वर्षे झाले शहरात सराव करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. ही समस्या क्रीडा संघटनेच्या प्रतिनिधींनी मांडली असता केंदळे यांनी यासंदर्भात चर्चा करून लवकरात लवकर रोड पासून जागा जवळ उपलब्ध करून देऊन विषय मार्गी लावण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

शेखर कुदळे यांनी अॅथलेटिक्स या खेळासाठी सुविधा आहेत पण, मैदान नाही. इंद्रायणीनगर येथील असलेले ग्राउंड सर्वांसाठी खुले करण्यात यावे. महिन्याला भाडे आकारण्यापेक्षा वार्षिक भाडे आकारावे. ऑफलाइन बुकिंगसाठी दूरवर जावे लागते. त्यामुळे ऑनलाईन बुकिंगची ही व्यवस्था व्हावी. इंद्रायणीनगर येथील मैदानातील ट्रॅक नव्याने तयार करावा. खेळा मध्ये बदल झालेले आहेत म्हणून नवीन साहित्यही उपलब्ध करून देण्यात यावे. या मागण्या केल्या असता याला केंदळे यांनी सकारात्मकता दर्शवली.

बॉक्सिंगसाठी शहरात अपुरे मैदाने आहेत. अजूनही मैदाने उपलब्ध व्हावेत. मैदाने आहेत त्या ठिकाणी अजून सुविधा वाढवाव्यात. अनेक दिवसांपासून शहरात बॉक्सिंगच्या स्पर्धा झालेल्या नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा घ्यावी. बॉक्सिंगसाठी रिंग तयार करावी. यावर बोलताना सभापती केंदळे म्हणाले, आयुक्त राजेश पाटील हे स्वतः एक खेळाडू असल्यामुळे याकडे ते लक्ष देतील. त्यामुळे या सर्व समस्या दूर होतील. सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.