Pune News : पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची जय्यत तयारी, बैठक आणि प्रत्यक्ष पाहणी करत दौऱ्याचे नियोजन

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याची जय्यत तयारी सुरु असून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या दौऱ्याच्या नियोजनाची बैठक घेऊन प्रत्यक्ष जागांची पाहणी केली. येत्या 6 मार्च रोजी होणाऱ्या या दौऱ्यात पुणे महापालिका, गरवारे मेट्रो स्टेशन येथे पंतप्रधान मोदी भेट देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. याच सर्व ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेण्यात आला.

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या नियोजन बैठकीस पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महामेट्रोचे महासंचालक ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आयुक्त विक्रम कुमार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर,पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, पीएमपीएमएल अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, कांॅग्रेस गटनेते आबा बागुल,सेनेचे गटनेते,पृथ्वीराज सुतार आदी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘भूमिपूजन केलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या लोकार्पणसाठीही पंतप्रधान मोदी शहरात येताहेत ही समस्त पुणेकरांसाठी आनंदाची बाब आहे. हा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात येत आहे. पुणे महापालिका आवारात साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ट पुतळा स्मारकाचे आणि पुणेकरांचे स्वप्न असणाऱ्या मेट्रोचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. शिवाय पंतप्रधान मोदी मेट्रोच्या गरवारे स्थानकापासून आनंदनगर स्थानकापर्यंतचा प्रवास करणार असून जवळ असणाऱ्या मैदानावर पुणेकरांना जाहीर कार्यक्रमाद्वारे संबोधित करण्याचेही प्रस्तावित आहे. या दृष्टीने आढावा घेतला’.

‘पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात महापालिका, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो या सर्वांशी समनव्यय ठेऊन सूक्ष्म नियोजन केले जात आहे. आढावा बैठकीत सर्व ठिकाणांचा आढावा घेतला गेला असून याचा अहवाल शासकीय पातळीवर पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला जाणार आहे. याबाबत आढावा घेऊन पंतप्रधान कार्यालयाकडून अंतिम नियोजन जाहीर केले जाणार आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.