Pune : महावितरणच्या अभियंता, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती (Pune) वीजपुरवठा खंडित केल्यानंतर शेजारून परस्पर अनधिकृत वीज वापरली. या प्रकरणी कारवाई करताना महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणल्याचा प्रकार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. या प्रकरणी एकाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महावितरणच्या मुळशी विभागातील उरूळीकांचन उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता धम्मपाल पंडित हे सहकारी जनमित्र सुनील शिंदे, अंचल बागडे, अश्विनी गोरे, किरण झेंडे यांच्यासह मंगळवारी (दि. 26) दुपारी अडीचच्या सुमारास थेऊरफाटा, कुंजिरवाडी येथे थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करीत होते.

Pune : विकसकाने नांदेड सिटीमध्ये आजपर्यंत किती कामे केली? माजी नगरसेवकांचे अनेक सवाल

यामध्ये आंबेकरवस्ती येथील लता मोहन दौंडकर यांच्या नावे असलेल्या घरगुती वीजबिलाची 9 हजार 150 रुपयांची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र वीजजोडणीची तपासणी केली असता या ग्राहकाकडे शेजारच्या वीजग्राहकाकडून अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याचे आढळून आले. या वीजचोरीबाबत स्थळपाहणी अहवाल तयार करण्यात आला. यासंदर्भात संबंधित (Pune) वीजग्राहकांना माहिती देत असताना गणेश दौंडकर याने तेथे येऊन स्थळपाहणीचा अहवाल फाडून टाकला. तसेच माझ्या दारात येण्याचा काय संबंध असे म्हणत उपकार्यकारी अभियंता पंडित व सहकाऱ्यांना धक्काबुक्की केली.

याप्रकरणी महावितरणकडून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. लोणी काळभोर पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.