Pune: राष्ट्रवादीचे नगरसेवक सव्वा दोन कोटीचे ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देणार- दिपाली धुमाळ

Pune: NCP corporator to provide 2.25 crore for oxygen beds: Deepali Dhumal सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नाही. हे फक्त कोरोनाच्या नावाखाली भरमसाठ खरेदी करण्यात व्यस्त आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने जवळपास पन्नास हजारांच्या घरात रूग्ण आढळले आहेत. त्यामानाने प्रशासनाकडे नियोजना अभावी आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध नाही. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड्स अभावी योग्य उपचार न मिळाल्याने आपले जीव गमवावे लागले आहे. याचीच जाणीव ठेऊन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आपल्या ‘स’ यादीतील विकासनिधीतून प्रशासनाला ऑक्सिजन बेड्स खरेदी करण्यासाठी तब्बल सव्वादोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सत्ताधारी व प्रशासन यांच्यातील नियोजना अभावी नाहक सर्वसामान्य पुणेकर नागरिकांचे बळी जात आहे. दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने दिल्लीतून एक तज्ज्ञांचे पथक पुण्यात कोरोना विषाणूची परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठविले होते.

या पथकाने जूलै महिना अखेर पुणे शहरात जवळपास 50 हजार रुग्ण संख्या होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तरीही सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. केंद्रीय पथकाच्या सुचनेनुसार आवश्यक दवाखाने, बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड्स, टेक्निशन, डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशन, असिस्टंट व इतर कर्मचारी यांची पुर्तता करून ठेवणे आवश्यक होते.

परंतु, एकीकडे 67/3 च्या नावाखाली भरमसाठ खरेदी करण्याकडेच यांनी जास्त लक्ष दिले आहे. वास्तविक पथकाच्या सुचनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळेच आज ही वेळ आली आहे. या गंभीर परिस्थितीला भाजपचे सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोपही दीपाली धुमाळ यांनी केला. .

उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी सर्व नगरसेवकांना व पक्षाच्या प्रत्येक सेलच्या पदाधिकारी यांना आपापल्या भागात कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून रस्त्यावर उतरून आवश्यक त्या उपाययोजना व उपक्रम राबविण्यास सांगितले आहे.

पुणे शहरात भाजपची सत्ता असून ते कोरोना विषाणूच्या महामारीचे संकट आटोक्यात आणण्यात अपयशी ठरले आहेत. या सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नाही. हे फक्त कोरोनाच्या नावाखाली भरमसाठ खरेदी करण्यात व्यस्त आहेत.

पुणेकर त्यांना प्रत्येक पैशाचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. विरोधी पक्षांना कुठेही विचारात न घेता एक हाती सत्तेच्या जोरावर वाटेल तसे निर्णय घेत आहेत. त्यामुळेच आज ही गंभीर परिस्थिती आटोक्यात आणण्यात हे सत्ताधारी अपयशी ठरले आहेत, अशीही टीका यावेळी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.