Pune News : पॅनेक्स – 21 ची सांगता, संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत साहसी सराव प्रदर्शन

एमपीसी न्यूज – आपत्ती काळात मदत कशी करायची याचा 20 ते 22 डिसेंबर असा तीन दिवसीय सराव कार्यक्रम, ‘पॅनएक्स – 21’ हा नुकताच पुण्यात पार पडला. भारत, नेपाळ, बांगलादेश, भूतान, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड या सात ‘बिमस्टेक’ राष्ट्रांच्या यात सहभाग होता. मंगळवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी साहसी सराव प्रदर्शनाची अनुभुती उपस्थितांनी घेतली.

‘संकटाच्या काळात सर्व सदस्य देशांना समर्थन आणि मदत करण्यासाठी भारत प्रयत्नशील राहील,’ असे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी यावेळी दिले. बिमस्टेक राष्ट्रांसाठी आपत्ती व्यवस्थापन बाबींमध्ये सामायिक क्षमता विकसित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

यावेळी देशाचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन, हवाई दलाच्या दक्षिण पश्चिम मुख्यालयाचे प्रमुख एअर मार्शल विक्रमसिंग, ‘फिक्की’च्या संरक्षण व अवकाश समितीचे सहअध्यक्ष अरुण रामचंदानी उपस्थित होते.

‘पॅनेक्स 21’ या उपकरण प्रदर्शनात मंगळवारी शस्त्रास्त्रांची पाहणी केली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते. संरक्षण मंत्री म्हणाले, ‘अलीकडच्या दशकांमध्ये देशाने चक्रीवादळ, त्सुनामी, भूकंप, पूर आणि कोरोना यांसारख्या आपत्तींची मालिका पाहिली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू आणि विनाश घडला.

परंतु या काळात ‘बिमस्टेक’ राष्ट्रांनी एकमेकांना सहकार्य केले आहे. या प्रकारच्या उपक्रमामुळे जमीन आणि सागरी प्रदेशांचे रक्षण करण्याची क्षमता वाढवणे, शाश्वत प्रादेशिक विकासासाठी कार्य करणे शक्य होते. ‘देशांच्या सुरक्षिततेबाबत प्रत्येक घटकाकडे समान लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ब्लू इकॉनॉमी, नैसर्गिक आपत्ती, दहशतवाद यांसारख्या अपारंपरिक धोक्यांना सामोरे जाण्यासाठी ‘पॅनेक्स’सारख्या सामूहिक कृतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. मानवनिर्मित संकटे आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी प्रभावी प्रतिसाद यंत्रणा विकसित करणे हा बिमस्टेकचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे,’ असेही ते म्हणाले.

 

भूकंप, आग यासारख्या नैसर्गिक आपत्तींना कसे सामोरे जायचे आणि त्यामध्ये आपत्ती दल कसे काम करते, याचे प्रदर्शन यावेळी दाखवण्यात आले. सीएमईच्या मैदानावर एक गाव दाखवले गेले. त्यात भूकंप झाल्यावर पोलीस, भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, स्वयंसेवी संस्था कसे मदत व बचाव कार्य करतात, हे दाखवण्यात आले. गावांमधून इंद्रायणी नदी वाहत असल्याचे दाखविण्यात आले. त्यांचे एकमेकांना जोडणारे पूल, इमारती, घरे, दुकाने यांची निर्मिती करण्यात आली होती. भूकंप झाल्यावर तुटलेला पूल, पडलेली घरे व जखमी झालेले नागरिक, नदीत अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोलीस, आरोग्य, तसेच आपत्ती व्यवस्थापनाने केलेली मदत दाखविण्यात आली.

 

पूल तुटलेला असल्याने आपत्तीग्रस्त गावात जाण्यासाठी लष्कराने लोखंडी पूल टाकून दळणवळण सुरू केले; तसेच रस्ते ब्लॉक झाल्याने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मशिन, पुलाचे साहित्य, औषधे पुरविण्यात आली. आग लागल्यावर हेलिकॉप्टरद्वारे ती आटोक्यात आणण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. आपत्तीच्या परिस्थितीत सशस्त्र दल आणि देशातील इतर प्रमुख आपत्ती निवारण एजन्सींच्या संसाधनांचा एकत्रित वापर केल्याने अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.