Talegaon Dabhade News : आपल्या न्याय व हक्काच्या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील शिक्षकेतर कर्मचा-यांना आंदोलन करावं लागतंय याचा खेद – मगन ताटे

एमपीसी न्यूज – वेतनातील तफावत, वेतन फरक, बढती आणि इतर मागण्यासाठी महाराष्ट्रातील शिक्षकेतर कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात इंद्रायणी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. आपल्या न्याय व हक्काच्या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील शिक्षकेतर कर्मचा-यांना आंदोलन करावे लागत आहे, याचा खेद वाटतो असे मत प्राध्यापक मगन महादेव ताटे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने जाहीर केलेल्या काम बंद आंदोलनात १८ डिसेंबर पासून इंद्रायणी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झालेले आहेत. या आंदोलकांना सेवानिवृत्त सहायक प्राध्यापक तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेचे कार्यकारणी सदस्य आणि राष्ट्र सेवा दल मावळचे कार्याध्यक्ष मगन ताटे यांनी बुधवारी (दि. २२) भेट दिली. त्यावेळी त्यांनी घोषणा देत त्यांचा आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

आपल्या न्याय आणि हक्काच्या मागण्यासाठी तमाम महाराष्ट्रातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागते याचा खेद होत आहे. आपण सर्वजण आंदोलनामध्ये सहभागी होऊन एकीचे बळ दाखवून झोपलेल्या शासनास जागे करीत आहात याचा मला अभिमान आहे. माझा या आंदोलनास पूर्ण पाठिंबा असून मी तुमच्या पैकी एक आहे. तुमच्या भावना, व्यथा, दुःख शासनाकडे पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त मदत करीन असे आश्वासन ताटे यांनी यावेळी बोलताना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.