Pune News : महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात

एमपीसी न्यूज – महावितरणच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे परिमंडलामध्ये क्रिकेट, रांगोळी स्पर्धा  तसेच स्नेहमेळावा व शैक्षणिक प्राविण्य मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गुणगौरव आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वीजग्राहकांना अविश्रांत सेवा देणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या आयोजनामुळे नवी ऊर्जा मिळाली.

 

महावितरणच्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी (दि. ६) सायंकाळी रास्ता पेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, मुख्य अभियंता सचिन तालेवार,  अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार,  प्रकाश राऊत,  सतीश राजदीप,  डॉ. सुरेश वानखेडे हे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते स्नेहमेळ्याचे उद्घाटन झाले.

 

४ ते ५ जून रोजी पुणे परिमंडल अंतर्गत विभागस्तरीय पुरुष व मंडलस्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेत मंचर विभागाच्या पुरुष संघाने व रास्तापेठ मंडलाच्या महिला संघाने विजेतेपद पटकाविले तर बंडगार्डन विभागाचा पुरुष संघ व गणेशखिंड मंडलचा महिला संघ उपविजेते ठरले. तसेच परिमंडलस्तरीय रांगोळी स्पर्धेत उज्ज्वला सोनार (प्रथम), काजल लिंबोळे (द्वितीय) तर अपर्णा मुळे यांनी (तृतीय) क्रमांक पटकाविले. स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमात क्रिकेट स्पर्धेतील विजेता व उपविजेत्या संघांना चषक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 

उच्च शिक्षणासाठी आयआयटीमध्ये प्रवेश मिळविणारे शिवम अंकुश नाळे,  हेमंत सुरेश वानखडे,  ऋषिकेश रवींद्र कारंडे,  डेलिया तुषार काळे, सृष्टी श्रीकांत गंगावणे, मयांक देविदत्त जोशी, आर्यन माणिक राठोड तसेच शैक्षणिकसह कला व क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे आदित्य राजेश काळे,  प्रद्युम्न्य संजय जगनाडे,  सोनल चंद्रकांत कानडे, यश सतीश उंडे आणि एमपीएससी स्पर्धा परिक्षेतून प्रशासकीय अधिकारी झालेले नीलेश कृष्णाजी सस्ते यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यानंतर हिंदी व मराठी गाण्यांचा संगीत रजनीचा कार्यक्रम झाला.

 

सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी, संतोष गहेरवार, भक्ती जोशी यांनी केले तर कार्यकारी अभियंता बाळासाहेब हळनोर यांनी आभार मानले. वर्धापनदिनानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर व सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.