Pune News : आयुक्तांकडून अनलॉकची सुधारित नियमावली 

एमपीसी न्यूज – पुण्यातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पालिका  आयुक्त  विक्रम कुमार यांनी शनिवारी सायंकाळी अनलॉकचे सुधारित आदेश  निर्गमित केले आहेत.

नियमावली पुढीलप्रमाणे 

  1. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने ही आठवडयातील सर्व दिवस (दुकानांची साप्ताहिक सुट्टी वगळून) रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील.
  2. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व मॉल्स आठवडयातील सर्व दिवस रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, मॉलमध्ये काम करणारे अधिकारी / कर्मचारी यांचे लसीकरण (दोन डोस) व दर 15 दिवसांनी कोविड तपासणी करणे बंधनकारक राहील. तसेच लसीकरणाचे दोन डोस झालेल्या ग्राहकांनाच मॉलमध्ये प्रवेश राहील. कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी मॉल व्यवस्थापनाची राहील.
  3. रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे आठवडयातील सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. पार्सल सेवा / घरपोच सेवा (होम डिलेव्हरी) रात्री 11 पर्यंत सुरू राहील.
  4. पुणे महापालिका क्षेत्रातील उद्याने सर्व दिवस सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 7 वाजपर्यंत सुरू राहतील.
  5. क्रीडा – जलतरण व निकट संपर्क येणारे खेळ वगळून इतर सर्व खेळ नियमितपणे सुरू राहतील.
  6. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पुर्णतः बंद राहतील. मात्र, ऑनलाइन शिक्षणास मुभा राहील.
  7. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र / क्लासेस (कोचिंग क्लासेस) हे सर्व दिवस रात्री 8 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. सदर ठिकाणी प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थींचे लसीकरण (किमान एक डोस) अनिवार्य आहे.
  8. व्यायामशाळा (जीम), सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार (बाय अपॉईंटमेंट) रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील.
  9. पुणे महापालिका क्षेत्रात रात्री 11 वाजेपर्यंत जमावबंदी तसेच रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत (अत्यावश्यक कारण वगळता) संचारबंदी राहील.
  10. या आदेशातील नमूद बाबीं व्यतिरिक्त इतर बाबींसाठी दि. 26 जून 2021 रोजी निर्गमित आदेश लागू राहील.
  11. सदर आदेश हे पुणे महापालिका क्षेत्रामध्ये येणार्‍या पुणे कॅन्टोमेंट आणि खडकी कॅन्टोमेंट यांना देखील लागू राहील.
  12. संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.