Pune News : पोलिसांच्या मेट्रोला सूचना, मेट्रो कामाच्या परिसरात प्रकाश व्यवस्था करा

एमपीसी न्यूज – महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने मेट्रोचे काम सुरू असलेल्या परिसरामध्ये प्रकाश व्यवस्था करण्याच्या सूचना पुणे पोलिसांनी महामेट्रोला केल्या आहेत. या अनुषंगाने महामेट्रोने महापालिका प्रशासनाला व्यवस्था करण्याचे पत्र दिले आहे. त्यानुसार पुढील काही दिवसात महापालिकेकडून व्यवस्था करण्यात येणार असल्याचे विद्युत विभागाचे अभियंते श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले.

मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणी महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका व पुणे पोलिस यांची एक बैठक झाली. शहरात अत्याचाराच्या घटना घडू नयेत, यासाठी दोन्ही प्रशासनांनी एकत्र येवून उपाय योजना करण्याचे नियोजन या बैठकीत झाले. यामध्ये ज्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था नाही, अशा ठिकाणी प्रकाश व्यवस्था करणे, सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे, रिक्षा चालक व मालकांची माहिती घेणे, प्रबोधन व जनजागृती करणे यांसह विविध उपाय योजना करण्यावर एकमत झाले.

या अनुषंगाने पुणे पोलिसांनी मेट्रोच्या कामामुळे पथदिवे काढाव्या लागलेल्या व यामुळे अंधार निर्माण झालेल्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था करण्याच्या सूचना महामेट्रोला केल्या आहेत. त्यानुसार महामेट्रोमे महापालिकेला पत्र देवून प्रकाश व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार विद्युत विभागाने मेट्रो कामासाठी काढण्यात आलेले पथदिव्याचे जुनेच खांब तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात येणार आहेत. या दिव्यांसाठी साठी ओव्हरहेड पद्धतीने केबल टाकण्यात येणार असल्याची माहिती कंदुल यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.