Pune Crime News : पोलीस आयुक्तांचा दणका! स्वारगेट परिसरातील स्वयंघोषित भाई अन् दादा टोळीवर मोक्का

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्याचा धडाका सुरूच असून आणखी एका टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे. स्वतः ला भाई अन दादा म्हणून घेणाऱ्या गोविंदसिंग टाक आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काची कारवाई करत त्यांची दहशत संपवली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेली ही ५५ वी मोक्का अंतर्गत कारवाई आहे.

गोविंदसिंग पापुलसिंग टाक (वय २२, रा. गुलटेकडी), राहूल उर्फ लल्या संजय कांबळे (वय २०, रा. मंगळवार पेठ), गणेश साहेबराव तुपे (वय ३१, रा. मंगळवार पेठ), ओंकार राजेंद्र भुजबळ (वय २२, रा. गणेश पेठ), सुनिल विजय चव्हाण (वय २७) व सौरभ उर्फ साहिल शिवशरण कांबळे (वय १९) अशी कारवाई करण्यात आलेल्या टोळीचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुलटेकडी परिसरात काही सराईत गुन्हेगारांची दहशत आहे. यामध्ये गोविंदसिंग टाक ही टोळी प्रमुख आहे. आतापर्यंत टाक स्वत:ला ‘दादा’ अन ‘भाई’ म्हणून घेत होता. काही दिवसांपूर्वीच स्वारगेट पोलिसांनी त्याला खूनाच्या गुन्ह्यात अटक केली होती. सराईत गुन्हेगार असलेल्या टाक याला गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे २०१९ मध्ये एक वर्षांसाठी एमपीडीएनुसार स्थानबद्ध केले होते. परंतु, कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याने गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या होत्या.

तपासात त्याने खंडणीसह इतर गुन्हे टोळीला घेऊन करत असल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी या टोळीवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव परिमंडळ दोनचे उपायुक्त सागर पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी या प्रस्तावाची छाननी करून तो कारवाईसाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे पाठविला आणि पोलीस आयुक्तांनी या दहशत टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.