Pune News : पुणे शहर पोलिसांच्या वतीने 26/11 हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ शालेय चित्रकला स्पर्धा

एमपीसी न्यूज – पुणे शहर पोलीस आणि सेवा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 26/11 हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सारसबाग येथे शुक्रवारी (दि.26) स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. अशी माहिती पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे आणि सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष जगदीश शेटे यांनी दिली.

पुणे शहर पोलीस आणि सेवा मित्र मंडळ यांच्यातर्फे दरवर्षी 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून देशभक्तिपर आणि सामाजिक विषयांवर आधारित भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी विविध शाळांमधील हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात, परंतु मागील वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा घेण्यात आली नाही.

यावर्षी नियम पाळून स्पर्धा घेण्यात येणार आहे. दरवर्षी स्पर्धेच्या एकाच ठिकाणी हजारो विद्यार्थी एकत्र येतात परंतु या वर्षी हे टाळण्यासाठी दि. 22 नोव्हेंबर रोजी प्रत्येक शाळेत किंवा घरी चित्र काढून शाळेत जमा करायचे आहे.

23 नोव्हेंबर 2021 रोजी स्थानिक पोलिस स्टेशनच्या प्रतिनिधीकडे किंवा शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ येथे शाळानिहाय सर्व स्पर्धकांची चित्रे संकलित करावयाची आहेत. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर, संदीप गायकवाड, नितीन होले, शेखर देंडगावकर करणार आहेत.

स्पर्धेमध्ये इयत्ता 1 ली ते 2 री या वर्गासाठी फुलपाखरू आणि भारतीय जवान हे विषय आहेत, तर 3 री ते 4 थी च्या वर्गासाठी राष्ट्रीय एकात्मता, झाडे लावताना मुले या विषयांवरील चित्रांमध्ये रंग भरणे ही स्पर्धा होणार आहे. इयत्ता 5 वी ते 7 वी वर्गासाठी राष्ट्रीय सामाजिक सण, एकात्मता बंधुभाव, पाणी हेच जीवन, वाहतूक सुरक्षा या विषयांवर चित्रे काढून पाठवायची आहेत.

8 वी ते 10 वी साठी पर्यावरण संवर्धन, सैनिक, पोलिस जीवन, बलवान माझा हिंदुस्थान, स्त्री भ्रूणहत्या हे विषय आहेत. तर खुल्या गटासाठी देशासाठी तरुणांचे योगदान, धूम्रपान एक शाप, वाहतूक समस्या या विषयांवर चित्रे काढायची आहेत. चित्रं काढल्यानंतर मागील बाजूस विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, इयत्ता, तुकडी, शाळेचे नाव व पत्ता टाकायचा आहे.

तरी शहिदांना समर्पित या चित्रकला स्पर्धेत शाळेच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सेवा मित्र मंडळ आणि पुणे शहर पोलीस यांच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 9922967852, 9881798182, 8888779393 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.