Pune : रमणबाग शाळेत धुमधडाक्यात पार पडला वार्षिक क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ

एमपीसी न्यूज – डेक्कन एज्युकेशन सोसायटी- न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग (Pune) शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव-पारितोषिक वितरण समारंभ आज आयोजित करण्यात आला होता.

शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित, भारतीय महिला क्रिकेटचे संस्थापक सदस्य,जिल्हा सहकारी वकील माननीय ॲड.नरेंद्र निकम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यार्थी दशेतच मुलांनी आपला आवडता खेळ निवडून त्याचा सराव करावा,खेळातील आपले उद्दिष्ट निश्चित करावे व नैपुण्य प्राप्त करून भारताचे नाव उज्वल करावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियमक मंडळाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष मा.ॲड.अशोक पलांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रमणबाग शाळेला लाभलेल्या विस्तीर्ण मैदानाचा उपयोग तन व मन सुदृढ करण्यासाठी विद्यार्थ्यांनी करावा असे त्यांनी सांगितले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियमक मंडळाचे माजी अध्यक्ष मा.डॉ.शरद कुंटे,कार्यवाह धनंजय कुलकर्णी,शाळेचे वित्त नियंत्रक डॉ.आशिष पुराणिक,डॉ.शरद आगरखेडकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी जिगर आत्मविश्वास व तंदुरुस्ती विद्यार्थी दशेत खेळलेल्या खेळातूनच येते असे प्रतिपादन डॉ.शरद कुंटे यांनी याप्रसंगी केले.

हार व जित या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्या खिलाडू वृत्तीने स्वीकारण्याचे संस्कार (Pune) क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांवर होतात असे प्रास्ताविकातून प्रशालेच्या शालाप्रमुख मनिषा मिनोच्या यांनी सांगितले.

Vadgaon : विकसित भारत संकल्प यात्रेत वडगाव शहरातील 300 नागरिकांचा सहभाग

मान्यवर व प्रशालेचे खेळाडू यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करून कार्यक्रमाचा आरंभ झाला.प्रशालेतील एनसीसीच्या छात्रांनी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिमाखदार संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली.डंबेल,घुंगुर काठी,निशाणी योगासने,लेझीम व मल्लखांब यांची मनोहारी व चित्त थरारक प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी याप्रसंगी सादर केली.

सुधा लांडे,सारिका रणदिवे,सीमा ढोण,मल्हारी रोकडे,रमेश शेलार, महेश जोशी व माधवी पांढरकर यांनी ही विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके बसवली.लंगडी,खोखो,कबड्डी,क्रिकेट, फुटबॉल,धावणे,गोळा फेक,चेंडू फेक, जोर मारणे, बुद्धिबळ इत्यादी सांघिक व वैयक्तिक खेळांच्या स्पर्धा क्रीडा महोत्सवा निमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या.

त्यात यशस्वी झालेल्या आठशे विद्यार्थ्यांना याप्रसंगी अतिथींच्या हस्ते ट्रॉफीज व प्रशस्तीपत्रके देण्यात आली.या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेच्या शालाप्रमुख मनिषा
मिनोच्या यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग प्रमुख माधवी पांढरकर यांनी सर्व क्रीडा शिक्षक व प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने केले. प्रशालेचे पदाधिकारी सुरेश वरगंटीवार तसेच प्रभारी पर्यवेक्षक जयंत टोले व उषादेवी भोसले यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास देशपांडे यांनी केले तर ज्येष्ठ क्रीडा शिक्षक महेश जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी पालक वृंद उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.