67 National Filmfare Awards : सुपरस्टार अभिनेते रजनीकांत ठरले ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराचे मानकरी

एमपीसी न्यूज – 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळ्यात दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ ने गौरवण्यात आले. त्यासोबतच अभिनेत्री कंगना रनौतला दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला.

‘सिनेसृष्टीत महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जाते. चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचा मला फार आनंद आहे. याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो. मी हा पुरस्कार माझे गुरु के. बालाचंद्र यांना समर्पित करतो,’ असे रजनीकांत म्हणाले.

रजनीकांत यांच्यासोबत अभिनेत्री कंगना रनौतला दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी कंगनाला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच अक्षय कुमारच्या केसरी या चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ या गाण्याचे पार्श्वगायक बी प्राक यांना या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. पिंपरी – चिंचवडकर सावनी रविंद्रला ‘बार्डो’ चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार मिळाला आहे.

हिंदी चित्रपट विभागात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या ‘छिछोरे’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला. तसेच अभिनेता मनोज बाजपेयी आणि दाक्षिणात्य अभिनेता धनूष या दोघांना विभागून सर्वोत्कृष्ट अभिनेता हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. हे सर्व पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.