Pune News : मोडी लिपीमध्ये एक लाख 11 हजार 111 वेळा ‘जाणता राजा’ लिहून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी

एमपीसी न्यूज – मोडी लिपीमध्ये एक लाख 11 हजार 111 वेळा ‘जाणता राजा’ लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ रांगोळी साकारली. श्रुती गणेश गावडे यांनी हा उपक्रम शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राबवला.

आपल्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाची गुपितं ज्या मोडी लिपीमध्ये दडली आहेत, जी भाषा शिवरायांच्या पराक्रमाचा वारसा अन स्वराज्याच्या रोमहर्षक इतिहासाचा वर्णन सांगते ती मोडी लिपी, आपली भाषा कालपरत्वे अडगळीला पडतो की काय असं वाटत असतानाच, श्रुती गावडे यांचा हा उपक्रम मोडी लिपीची साक्षरता दर्शवणारा देखील आहे.

श्रुती गावडे या मोडी लिपीच्या प्रसार आणि प्रचारासाठी अभिनव आणि कलात्मक उपक्रम राबवत असतात. अनेक स्तुत्य उपक्रम राबविल्यानंतर यंदा मोडी लिपीच्या माध्यमातून शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यासाठी श्रुती यांनी कोथरुडमध्ये नॉर्थ डहाणूकर कॉलनी, तेजस नगर येथे शिवाजी महाराजांची 1200 चौरस फुटी रांगोळी मोडी लिपीमध्ये लिहून साकारली आहे.

त्यामध्ये तब्बल एक लाख अकरा हजार एकशे अकरा वेळा जाणता राजा या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. शिवरायांना मानवंदना देण्यासाठी व ही रांगोळी बघण्यासाठी अनेक नागरिक डहाणूकर कॉलनी येथे भेट देत आहेत. या उपक्रमाचे आयोजन हर्षाली दिनेश माथवड यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.