Chandrakant Patil : महापालिका क्षेत्रातील रस्ते युद्धपातळीवर दुरुस्त करा –  चंद्रकांत पाटील 

एमपीसी न्यूज – महापालिका क्षेत्रातील रस्ते युद्धपातळीवर दुरुस्त करावेत, तसेच नागपूरप्रमाणे पुण्यातील रस्त्यांचे आगामी काळात सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याच्या दृष्टीने विचार करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिल्या.तसेच कर संकलन प्रश्नी सध्या स्थगितीच असून, दीर्घकालीन उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुणे महापालिका क्षेत्रातील विविध समस्यांचा आढावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी घेतला. यात प्रामुख्याने रस्ते, समान पाणीपुरवठा, कर संकलन, नदीसुधार प्रकल्प आदींसंदर्भात सविस्तर चर्चा केली.

यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, गटनेते गणेश बिडकर, शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, गणेश कळमकर, पुनीत जोशी यांच्या सह महापालिकेचे सर्व अधिकार उपस्थित होते.

पुणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.कोल्ड मिक्सने रस्त्यांची दुरुस्ती शक्य होत नाही.सध्या पावसाने विश्रांती घेतली असल्याने, महापालिका क्षेत्रातील रस्ते युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी यावेळी आयुक्तांना केली.तसेच, नागपूर महापालिका क्षेत्रातील रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरण झाल्याने तेथील रस्ते खड्डेमुक्त झाले आहेत. पुण्यातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्याच्यादृष्टीने उपाययोजना केल्यास, किमान 30 वर्षांची समस्या सुटेल. त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजना लक्षात घेऊन, पुण्यातील रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना त्यांनी आयुक्तांना यावेळी केली.

पुण्यातील कर संकलनासंदर्भात पाटील म्हणाले की, पुणेकरांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये मिळणारी 40 टक्के करसवलत रद्द करुन, पूर्वलक्षी प्रभावाने नियमित देयकांव्यतिरिक्त पाठविण्यात आलेल्या फरकांच्या देयकांबाबत पुढील निर्णय होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.मी स्वतः या विषयात लक्ष घालून येत्या 12 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक घेऊन यावर दीर्घकालीन मार्ग काढू, व पुणेकरांना निश्चित दिलासा देऊ, असे यावेळी आश्वास्त केले.

समान पाणीपुरवठा आणि नदी सुधार योजनांबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.पुणे महापालिकेची महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेपैकी 132 पैकी 12 झोनचे काम पूर्ण झाले असून, 46 झोनचे काम प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. त्यावर ही सर्व कामे नियोजनबद्ध पूर्ण करावेत, अशी सूचना मंत्री पाटील यांनी यावेळी आयुक्तांना केली.

दरम्यान, पुणे मनपा क्षेत्रातील सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत.दर महिन्याला संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाईल, त्यामुळे कोणत्याही कामात दिरंगाई करु नये, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करु, अशा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.