Pimpri News: महापालिकेतील भाजपच्या चुकीच्या कारभाराविरोधात आंदोलन करणार; मित्रपक्ष आरपीआयचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. महापालिका रुग्णालयातील मनुष्यबळाचे खासगीकरण केले जात असून या ठेकेदारीपद्धतीत फार मोठा भ्रष्टाचार आहे. भाजप आमचा मित्रपक्ष असला. तरी, आमची शहरातील जनतेशी बांधिलकी आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या कारभाराविरोधात आवाज उठविणार, तीव्र आंदोलन करणार आहोत. वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेतली जाईल, असा इशारा आरपीआयच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी दिला.

पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सोनकांबळे पुढे म्हणाल्या, ”आमची भाजपसोबत युती आहे. पण, पिंपरी-चिंचवड महापालिकेत चुकीच्या पद्धतीने कारभार सुरु आहे. नोकर भरती बंद करुन महापालिका रुग्णालयात ठेकेदारी पद्धत सुरु केली. त्यात मोठा भ्रष्टाचार आहे. कोणासोबत युती आहे, म्हणून आम्ही शांत बसणार नाही. कोणाला घाबरणार नाही. प्रसंगी वेगळो होऊ पण चुकीच्या कारभाराविरोधात आवाज उठविला जाईल. तीव्र विरोध करु, वेळप्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठविले जातील. कोरोनामुळे महिलेचे निधन झाले असल्यास तिच्या पतीला महापालिकेने मानधन द्यावे अशी आमची मागणी आहे. महापालिकेने ती मान्य करुन त्याची अंमलबजावणी करावी”.

पिंपरी-चिंचवड शहरात आरपीआयला मानणारा मोठा वर्ग आहे. शहरात एक लाखांपेक्षा जास्त पक्षाचे सभासद आहेत. त्याचे आगामी महापालिका निवडणुकीत मतात परिवर्तन करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत युतीमध्ये आम्ही भाजपकडे 7 जागा मागितल्या होत्या. भोसरीतील लांडेवाडी अशा ठिकाणी जिथे पक्षाची ताकद आहे. तेथील जागा मागितल्या होत्या. पण, केवळ 3 जागा दिल्या. त्यानंतर 1 स्वीकृत नगरसेवकपद देण्याचे भाजपने मान्य केले होते. पण, पद देण्याची वेळ आल्यावर शहर भाजपने टोलवाटोलवी केली. राज्य स्तरावरील नेत्यांकडे बोट दाखवत स्वीकृत नगरसेवकपद आम्हाला दिले नाही. त्यामुळे आता अगोदर सर्व ठरवूनच भाजपसोबत युती केली जाईल, असेही सोनकांबळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.