Pimpri News: शिस्तीच्या नावाखाली ‘ग्रीन मार्शल’चा उच्छाद, पथक बंद करा; अन्यथा….

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेने नियुक्त केलेल्या ‘ग्रीन मार्शल’ पथकाने शिस्तीच्या नावाखाली उच्छाद मांडला आहे. या पथकातील लोक लष्करी गणवेश घालून रायफल हातात घेऊन खुलेआम दहशत माजवत फिरतात. चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी रायफलची गरज आहे काय? असा सवाल करत हे ग्रीन मार्शल पथक ताबडतोब बंद करावे, अन्यथा न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी दिला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात नाईक यांनी म्हटले आहे की, आयुक्त राजेश पाटील यांनी शिस्तीच्या नावाखाली शहरात ग्रीन मार्शल नावाची यंत्रणा अंमलात आणली आहे. या यंत्रणेवर आयुक्तांचे नियंत्रण आहे का, या पथकातील लोक लष्करी गणवेश घालून तसेच रायफल हातात घेऊन खुलेआम दहशत माजवत फिरतात. या कर्मचाऱ्यांना आवाज जोरात असतो. सीबीआय, इडी या केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी असल्यासारखा त्यांचा रूबाब असतो. चौकातील वाहतुकीचा अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर, भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी रायफलची गरज आहे का? जवाब प्रशासक म्हणून आपण द्यावा.

प्रत्येक गोष्ट साध्य करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. आपण या कर्मचाऱ्यांना लष्करी गणवेश धारण करण्याची परवानगी दिली आहे. याचा अर्थ आपण लष्कराचा अपमान करीत आहात. तसेच सर्वसामान्यांची फसवणूक करतात. त्यांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. पोलिसांच्या हातात देखील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काटी असते. मग हे तुमचे मार्शल रायफल घेऊन रस्त्यावर दमदाटी करत का फिरतात? याबद्दल तुमच्यावर गुन्हा दाखल का करू नये?

दुसरा महत्वाचा मुद्दा असा की गर्दीतील कुणा माथेफिरूने मार्शलच्या हातातील रायफल ओढून गोळीबार केला आणि त्यातून अघटित घडले तर याची जबाबदारी प्रशासक साहेब आपल्यावर येऊ शकते. त्यामुळे आपल्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ही मार्शलची व्यवस्था पूर्णता बंद करावी. लष्करी गणवेश घालण्यास परवानगी देण्याचे प्रकार बंद करावेत. अन्यथा आपल्याविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल, असा इशारा नाईक यांनी पत्रातून दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.