Pune News : …म्हणून मलाही पुण्यात राहायला यावेसे वाटतेय – रामदास आठवले 

एमपीसी न्यूज : “चांगल्या आरोग्यासाठी हर्बल गार्डन अतिशय उपयुक्त आहे. येथील औषधी वनस्पती, त्याचा येणारा सुवास, त्यामुळे मुलांना उद्यानात खेळताना आरोग्यदायी वातावरण उपलब्ध होणार आहे. ‘भाजप-रिपाइं’ युतीमुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. या विकासकामांसह हर्बल गार्डन, उद्याने यामुळे पुणे राहण्यासाठी अधिक चांगले बनत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. पुण्याचा विकास पाहून मलाही मुंबई सोडून पुण्यात राहण्यास यावेसे वाटतेय, असे आठवले यांनी मिश्कीलपणे सांगितले.

माजी उपमहापौर नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या संकल्पना व विकास निधीतून उभारलेल्या ‘वीरचक्र सन्मानित कर्नल सदानंद साळुंके हर्बल गार्डन’चे लोकार्पण रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. प्रसंगी उपमहापौर सुनीता वाडेकर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, “1971 च्या युद्धात योगदान दिलेल्या कर्नल सदानंद साळुंके यांच्या नावाने हे औषधी उद्यान झाले, याचा आनंद आहे. या उद्यानातून आरोग्याला पूरक गोष्टी, तसेच मुलांना औषधी वनस्पतींविषयीचे ज्ञान मिळेल. गेल्या पाच वर्षात पुण्यात विकासकामांची मालिका सुरु आहे. रस्ते, पाणी, उद्याने, वाहतूक व्यवस्था, मेट्रो, उड्डाणपूल असे अनेक प्रकल्प उभारले जात आहेत. डॉ. धेंडे यांनी आपल्या भागातील इतर नगरसेवकांच्या सहकार्याने चांगले काम केले आहे. येत्या निवडणुकांत भाजप-रिपाइं युतीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.