Talegaon Dabhade News : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने दिवाळी निमित्त विशेष कार्यक्रम; शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेमार्फत शिक्षक व सहकारी बांधवांसाठी विशेष दीपावली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांचा एकमेकांशी परिचय व्हावा, नाविन्यपूर्ण कल्पना आणि विचारांची देवाण-घेवाण व्हावी या उद्देशाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 

याप्रसंगी इंद्रायणी विद्यामंदिर संस्‍थेचे अध्यक्ष श्री रामदास काकडे, कार्यवाह श्री चंद्रकांत शेटे, सदस्य विलास काळोखे, निरुपा कानिटकर, संदीप काकडे, महाविद्यालय विकास समिती सदस्य परेश पारेख, चंद्रभान खळदे, प्राचार्य डॉ. एस के मलघे, डॉ. बी बी जैन, प्राचार्य जी. एस शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात शिक्षकांसाठी सांघिक भावना, संवाद कौशल्य, बौद्धिक  तसेच मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिक्षकांची पाच विविध गटात विभागणी करण्यात आली. शिक्षकांनी उस्फूर्तपणे विविध खेळात सहभागी होताना आपल्यातील सुप्त कलागुणांचे, समन्वयाचे, संवाद कौशल्याचे, सांघिक भावनेचे दर्शन घडवित विविध खेळांचा आस्वाद घेतला.

हेतू स्वच्छ आणि उद्दिष्ट एक असले तरी आवश्यक तसेच योग्य संवादा अभावी अपेक्षित निकाल मिळत नाही, हेतू साध्य होत नाही असे सांगताना संस्थेच्या नियामक मंडळ सदस्य निरुपा कानिटकर यांनी विविध विभाग आणि कर्मचाऱ्यांमध्ये आवश्यक संवाद कौशल्याचे महत्व स्पष्ट केले.

संस्थेचे विकास समिती सदस्य व तळेगाव दाभाडे नगरपरिषदचे माजी नगरसेवक चंद्रभान खळदे यांनी संस्थेच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आज मावळ तालुक्यात शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य संस्था आहे. चिंचवडलगत असणाऱ्या तळेगाव, मावळ परिसराच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाची जडणघडण या संस्थेचे माजी अध्यक्ष मावळभूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे साहेब यांच्या प्रयत्नातून झाली. इंद्रायणी या संस्थेबरोबर मावळ तालुक्यातील सर्व  संस्था विकासाच्या वाटचालीचे खरे शिल्पकार भेगडे साहेब आहेत.

साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून आज संस्थेचे विद्यमान अध्यक्ष  श्री रामदास काकडे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असताना संस्थेचा त्यांनी कायापालट केला आहे. बी.फार्मसी,डी. फार्मसी महाविद्यालये. वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय अशा अनेक महाविद्यालयांची रामदास काकडे यांनी उभारणी केली आहे. संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे यांचे योगदान देखील महत्वपूर्ण आहे. संस्थेचे उपाध्यक्ष श्री गोरखभाऊ काळोखे, श्री .दीपक शहा व खजिनदार श्री .शैलेशभाई शहा उत्तम पद्धतीने काम पाहत आहेत.

इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेला लाभलेली पंधरा एकर जागा तसेच निसर्गरम्य परिसर, भौतिक सोईसुविधा उपलब्ध असलेल्या इमारती आणि पाच हजारांहून अधिक शिक्षण घेणारे विद्यार्थी असे मावळ तालुक्यात शैक्षणिक संकुल उभे राहिले आहे.

या वेळी इंद्रायणी संस्थेमार्फत स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले. तसेच दीपावली निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या.आणि दिवाळी भेटही देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या सदस्या  निरुपा कानिटकर यांनी केले .सांस्कृतिक कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.