Chinchwad Crime News : पोलीस चौकीतून पळून गेलेल्या आरोपीला बारा तासात अटक

एमपीसी न्यूज – खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी पोलीस चौकीतून पोलिसांची नजर चुकवून पळाला. ही घटना बुधवारी (दि. 8) दुपारी पावणे पाच वाजता वाल्हेकरवाडी पोलीस चौकीत घडली. या घटनेनंतर बारा तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला पुन्हा अटक केली आहे.

राजकुमार रोहित गुप्ता (वय 34, रा. संभाजीनगर, आकुर्डी. मूळ रा. बिहार) असे पोलीस चौकीतून पळालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास मडके यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजकुमार याच्यावर एप्रिल 2021 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यात त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने 10 डिसेंबर पर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राजकुमार याला पिंपरी पोलीस ठाण्यातील लॉकअप मध्ये ठेवण्यात आले होते. बुधवारी (दि. 8) त्याला पिंपरी लॉकअप मधून चौकशीसाठी वाल्हेकरवाडी पोलीस चौकीत आणण्यात आले होते.

दरम्यान, पोलीस चौकीत राजकुमारने जीव गुदमरल्याचा आणि उलटी आल्याचा बहाणा केला आणि चौकीच्या बाहेर आला. त्याने पोलिसांची नजर चुकवून त्याच्या हातातील बेडी काढून ती चौकीतल्या बाकावर ठेवली आणि पळून गेला.

आरोपी राजकुमार घाबरून चौकीतून पळून गेला होता. रात्रभर तो आकुर्डी परिसरात फिरत होता. सकाळी त्याला आकुर्डी गावठाण मंदिरापासून ताब्यात घेण्यात आले असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.