23.3 C
Pune
गुरूवार, ऑगस्ट 11, 2022

MPC News Event : दृक्श्राव्य व प्रकट मुलाखतींच्या माध्यमातून शनिवारी उलगडणार ऐतिहासिक चित्रपटांच्या जन्मकथा

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – ऐतिहासिक चित्रपटांची, नाटकांची आणि दूरचित्रवाणी मालिकांची निर्मिती हे खरोखरच सर्वार्थाने आव्हानात्मक मानले जाते. या ऐतिहासिक कलाकृतींच्या जन्माची कथा येत्या शनिवारी (25 जून) रसिकांपुढे उलगडणार आहे. निमित्त आहे एमपीसी न्यूज ‘कला संवाद’ (MPC News Event) आयोजित ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ या दृक्श्राव्य व प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे!

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी (25 जून) दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून प्रथम येईल त्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रेक्षागृहातील काही आसने निमंत्रितांसाठी राखीव असतील.

या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केलेले नामवंत अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे, अनेक चित्रपटांसाठी भव्य-दिव्य व कलात्मक सेट उभारून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना पुन्हा ऐतिहासिक नाटकांकडे खेचून आणणारे ताकदीचे अभिनेते अविनाश नारकर, छत्रपती शाहू महाराजांची भूमिका समर्थपणे सादर करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर हे मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नामवंत मुलाखतकार सुधीर गाडगीळ हे कार्यक्रमाचे सूत्रसंवादक असणार आहेत.

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (PCET) व एसएआर इंडस्ट्रीज हे या कार्यक्रमाचे सहप्रयोजक तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पिंपरी-चिंचवड शाखा व इंद्रायणी इंडस्ट्रीयल इस्टेट हे सहयोगी प्रायोजक आहेत.

देशातील अग्रेसर मराठी वृत्तवाहिनी ‘एबीपी माझा’ ही या कार्यक्रमाचा टेलिव्हिजन पार्टनर आहे तर ‘रागा’ हॉटेल समूहाने हॉस्पिटॅलिटी पार्टनर म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी त्यांच्या काळात एकापेक्षा एक सरस ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती केली. तो मराठी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांत मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपटांची लाट आल्याचे पहायला मिळत आहे. भालजी पेंढारकर यांचा ऐतिहासिक चित्रपटांचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न नव्या दमाचे दिग्दर्शक, अभिनेते, कला दिग्दर्शक आपापल्या परीने करीत आहेत. त्याला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटसृष्टी तसेच दूरचित्रवाणी मालिकांमधील या नव्या ट्रेंडचा वेध घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात फर्जंद, शेर शिवराय, पावनखिंड, हंबीरराव, तानाजी, रमा- माधव, बाजीराव-मस्तानी, पानिपत, पद्मावत असे किती तरी दर्जेदार ऐतिहासिक चित्रपट तसेच राजा शिवछत्रपती, स्वराज्य रक्षक संभाजी, लोकराजा राजर्षी शाहू या सारख्या दूरचित्रवाणी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आणि पसंतीसही उतरल्या.

सर्वांनी आवर्जून पाहावा व ऐकावा असा हा दृकश्राव्य व प्रकट मुलाखतींचा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. या कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या कलाकारांकडून ऐतिहासिक कलाकृतींच्या निर्मितीशी संबंधित अनुभव ऐकण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एमपीसी न्यूजचे (MPC News Event) मुख्य संपादक विवेक इनामदार यांनी केले आहे.

spot_img
Latest news
Related news