Pimpri News: विधानपरिषदेसाठी शहराला पुन्हा डावलले!

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या शहराध्यक्षांची निराशा

एमपीसी न्यूज – राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 जागांमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षातून पिंपरी-चिंचवड शहरातील एकालाही स्थान मिळाले नाही. यावेळीही शहराकडे राजकीय दुर्लक्ष झाले.  राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या दोन पक्षापैकी एका शहराध्यक्षाला संधी मिळेल अशी चर्चा होती. पण, दोघांनाही डावलण्यात आले आहे. त्यामुळे दोनही पक्षाच्या शहराध्यक्षांची निराशा झाली आहे. तसेच शिवसेनेचा पुणे जिल्ह्यात एकही आमदार नाही. त्यामुळे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना विधानपरिषदेवर संधी मिळेल अशी चर्चा होती. पण, त्यांनाही संधी मिळाली नाही.

राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 जागांची महाविकास आघाडी सरकारने शुक्रवारी भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिफारस केली आहे. शिवसेना चार, राष्ट्रवादी काँग्रेस चार आणि काँग्रेसकडून चार जणांची शिफारस केली आहे. त्यामध्ये  पिंपरी-चिंचवड शहरातून कोणालाच संधी मिळाली नाही.

पिंपरी महापालिकेची निवडणूक 14 महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी किंवा काँग्रेस शहराला एक जागा सोडेल असे सांगितले जात होते. राष्ट्रवादीचा शहरात एक आमदार आहे. त्यामुळे आणखी एक आमदारकी मिळण्याची शक्यता कमी होती. पण, शहराध्यक्ष संजोग वाघेरे जोरदार प्रयत्न करत होते; मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

काँग्रेसचा पिंपरी-चिंचवडमध्ये एकही नगरसेवकही नाही. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस शहरात विधानपरिषदेची आमदारकी देवून पक्षाला ताकद देईल, अशी चर्चा होती. परंतु, काँग्रेसने पुन्हा शहराकडे दुर्लक्ष केले आहे.  राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन शहराध्यक्षांपैकी एकाच्या गळ्यात विधानपरिषदेची माळ पडेल अशी चर्चा होती. परंतु, ती चर्चाच राहिली.

कशामुळे नाकारली आमदारकी?
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली 2017 ची पालिका निवडणूक लढविण्यात आली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीची एकहाती सत्ता गेली. त्यानंतर झालेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही पवार घराण्यातील उमेदवार असून राष्ट्रवादीला शहरातून मतांची आघाडी मिळाली नाही. वाघेरे पालिकेतील भाजपच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत नाहीत. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवित नाहीत. कधीतरी प्रसिद्धपत्रक काढून मोकळे होतात, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात दबक्या आवाजात सुरू आहे. ही कारणे आमदारकी नाकारण्याची  असू शकतात असेही सांगितले जाते. अनेकजण पक्ष सोडून जात असताना त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली. नेतृत्व करण्यास कोणीही तयार होत नसताना. वाघेरे यांनी जबाबदारी घेतली. लोकसभेला मावळमधून ते तीव्र इच्छुक होते. पण, पार्थ पवार यांच्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे वाघेरे यांना विधानपरिषदेवर संधी मिळेल असे त्यांच्या समर्थकांना वाटत होते. पण, पक्षाने संधी दिली नाही.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांना पालिकेच्या निवडणुकीत  स्वतःसह पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. भाजपच्या केंद्रातील नेत्यावर ते टीका करतात. पण, शहरातील भाजप नेत्यांवर एक शब्दही बोलत नाहीत. पालिकेतील भ्रष्टाचारावर आक्रमक भूमिका घेत नसल्याच्या तक्रारी काँग्रेसमधील एक गट करत आहे.  या त्यांच्या उणिवेच्या बाजू मानल्या जातात. तर,  पडत्या काळात पक्षाची धुरा हाती घेवून त्यांनी  शहरात काँग्रेस जिवंत ठेवली आहे. ही जमेची बाजू आहे. पण, पक्षाने त्यांनाही विधानपरिषदेवर संधी दिली नाही.

महाविकास आघाडी सरकारने या नावांची केलीय शिफारस!

शिवसेना – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, उपनेते नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस – माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी खासदार राजू शेट्टी, यशपाल भिंगे, गायक आनंद शिंदे आणि काँग्रेसकडून प्रवक्ते सचिन सावंत, माजी खासदार रजनी पाटील, मुजफ्फर हुसैन, अनिरुद्ध वणगे यांच्या नावाची शिफारस केली आहे. आता राज्यपाल या नावांना मंजुरी देतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.