Pune News : लग्न करण्यासाठी नकार देणाऱ्या प्रेयसीचा खून, 17 दिवसांनी उघडकीस आली घटना

एमपीसी न्यूज : चौदा वर्षांपासून प्रेमप्रकरण असतानाही लग्न करण्यासाठी नकार देणाऱ्या प्रेयसीला शेवटचे भेटण्याच्या बहाण्याने बोलावून तिचा खून करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली. 17 दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला. मनीषा गेडाम (वय 30) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सागर गुडाव याला अटक केली आहे. 

या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, मनीषा आणि सागर दोघेही अमरावती येथील रहिवासी आहे. मागील 14 वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. परंतु कुटुंबियांच्या विरोधामुळे मनीषा लग्न करण्यासाठी नकार देत होती. सागर तिला सातत्याने फोन करायचा परंतु ती त्यालाही प्रतिसाद देत नव्हती. दरम्यान तुला शेवटचे भेटायचे आहे असे सांगून सागरने 13 मार्च रोजी तिची भेट घेतली.

त्यानंतर दोघेही दुचाकी गाडीवरून फिरण्यासाठी बाहेर पडले. महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी जाण्याचा दोघांचाही प्लान होता. परंतु तो प्लॅन रद्द करून दोघेही भाटघर धरणाच्या दिशेने गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर मनीषा बेसावध असताना आरोपीने तिच्या डोक्यात दगड घाल घालून खून केला आणि घटनास्थळावरून पसार झाला.

परमाणु मनीषा बेपत्ता झाल्यामुळे चंदन नगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा संशय आरोपी सागर याच्यावर होता. परंतु तो सापडत नव्हता. अखेर अमरावती पोलिसांना तो 25 मार्च रोजी सापडला. पुणे पोलिसांनी त्याला अमरावती पोलिसांकडून ताब्यात घेत विचारपूस केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

चंदननगर पोलिसांनी त्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी मनीषा हिचा मोबाईल, अंगावरील कपडे, पायातील शूज आणि काही मानवी हाडे दिसून आली.. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे चंदन नगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.