Pune News : जनता वसाहतीतील कॅनॉलमध्ये पडली रिक्षा; एकजण वाहून गेल्याची भीती

एमपीसी न्यूज – पुण्यातील जनता वसाहत येथील कॅनॉलमध्ये रविवारी रात्री आठच्या सुमारास एक रिक्षा कोसळली. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि स्थानिक नागरिकांनी दोरीच्या मदतीने रिक्षा बाहेर काढली. परंतु रिक्षाचालक वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे.

काही स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जनता वसाहत येथील कॅनॉल लगत असलेल्या एका गल्लीत प्रवाशाला सोडण्यासाठी आठच्या सुमारास एक रिक्षा आली होती. प्रवाशाला सोडल्यानंतर ही रिक्षा वळवून परत जात असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि रिक्षा थेट कॅनॉलमध्ये पडली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी आरडाओरडा करत अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती दिली.

घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वप्रथम रिक्षात कोणी व्यक्ती आहेत का याचा शोध घेतला, परंतु त्यांना कोणीही आढळले नाही. त्यानंतर स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळून दोरीच्या सहाय्याने रिक्षा बाहेर काढली. परंतु रिक्षाचालक आढळून आला नाही. त्यामुळे रिक्षाचालक वाहून गेला असण्याची भीती वर्तवली जात आहे. दरम्यान अंधार असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य थांबवले असून उद्या सकाळी पुन्हा एकदा शोधकार्य सुरू केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.