Hinjawadi : बांधकाम साइटवरून साडेतीन लाखांचे साहित्य पळवले

एमपीसी न्यूज – बांधकाम साइटवरून पॉलीकॅब कंपनीची वायर आणि प्लंबिंगचे साहित्य एकूण 3 लाख 66 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 26) सकाळी नऊच्या सुमारास भोगाव रोड बावधन खुर्द येथे उघडकीस आली.

सत्येन पुरुषोत्तम भुरके (वय 43 रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमाने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन खुर्द येथे रोगन मधुबन फेज 2 ही बांधकाम साईट सुरू आहे. त्या बांधकाम साईटवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये बांधकामासाठी लागणारे इलेक्ट्रिक वायर आणि इलेक्ट्रिक साहित्य तसेच प्लंबिंगचे साहित्य आणून ठेवले आहे. अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी रात्री पत्र्याच्या स्टोअरचे कडीकोयंडा तोडून त्यातून दोन लाख 74 हजार रुपये किमतीचे पॉलीकॅब कंपनीची वायर स्वीच सॉकेट आणि 92 हजार रुपये किमतीचे प्लंबिंगचे साहित्य असा एकूण 3 लाख 66 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.