MHA Guidelines : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाइन्स जाहीर

31 डिसेंबपर्यंत नियम लागू

एमपीसी न्यूज – देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्र्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. हे नियम 1 ते 31 डिसेंबपर्यंत लागू असणार आहेत. दरम्यान याआधी अटींसोबत परवानगी देण्यात आलेल्या गोष्टी सुरु राहणार असल्याचं गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. गृह मंत्रालयाच्या वतीने दक्षता, प्रतिबंध आणि मागोवा घेण्याविषयी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. 

 

संपूर्ण देशभर कोविड-19 महामारीचा उद्रेक झालेला आहे. मात्र जर मार्गदर्शक तत्वांचे कसोशीने पालन केले गेले तर देशातल्या सक्रिय रूग्णसंख्येमध्ये निरंतर घट होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आज जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे मुख्य लक्ष्य कोविड-19 चा होणारा प्रसार रोखणे हा आहे. काही राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अलिकडच्या दिवसांमध्ये कोविड रूग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

 

सध्याचा सणांचा काळ आणि हिवाळा लक्षात घेता रूग्णसंख्या वाढण्याचा अंदाज आहे. या महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी दक्षता घेणे अतिशय महत्वाचे आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजना सक्तीने राबविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आता सरकारने प्रतिबंध करणे आणि दक्षता घेणे आणि साथीचा प्रसार रोखण्यासाठी जी व्यूहरचना केली आहे, त्याचे सक्तीने पालन करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या संदर्भात गृह मंत्रालयाने आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. स्थानिक जिल्हा पातळीवर पोलिस, महानगरपालिका यांनी आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये निर्देशित केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यासाठी जबाबदार असणार आहेत. केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार कोविड-19 प्रसार रोखण्यासाठी निर्बंध लादावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

 

गृहमंत्रालयाने पाळत, नियंत्रण ठेवणे आणि सावधगिरी बाळगण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना सक्तीने नियमांची अमलबजावणी करण्यास सांगण्यात आलं आहे. तसंच अनेक गोष्टींसाठी नियमावली जाहीर केली असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्याही सूचना आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसंच स्थानिक प्रशासन, पोलिसांवर नियमांची योग्य अमलबजावणी करण्याची जबाबदारी असणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारांनी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी अशी सूचना गृहमंत्रालयाकडून करण्यात आली आहे.

 

कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याची सक्ती केली जावी. याशिवाय ज्या शहरांमध्ये आठवड्यातील पॉझिटिव्ह रेट 10 टक्क्यांच्या वर आहे तिथे कार्यालयीन वेळांबद्दल योजना तसंच इतर उपाययोजनांबद्दल विचार करावा जेणेकरुन सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल असंही गृहमंत्रालयाने सांगितलं आहे.

 

गृहमंत्रालयाने यावेळी राज्यं आणि केंद्राशासित प्रदेश परिस्थितीचा आढावा घेत करोनालो रोखण्यासाटी स्थानिक स्तरावर नाईट कर्फ्यूसारखे निर्बंध लावू शकतात असं स्पष्ट केलं. मात्र केंद्र सरकारशी चर्चा केल्याशिवाय कंटेनमेंट झोनच्या बाहेर लॉकडाउन लावला जाऊ नये असंही यामध्ये सांगण्यात आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.