Pimpri News : वारकरी सांप्रदायातील विठ्ठलराव उर्‍हे यांचे वृद्धपकाळाने निधन

एमपीसी न्यूज – अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीतील वारकरी सांप्रदायातील विठ्ठलराव सखाराम उर्‍हे-पाटील यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 97 होते. तळेगावदाभाडे येथील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक दादासाहेब उर्‍हे पाटील, चिंचवड येथील उद्योजक बाळासाहेब उर्‍हे पाटील यांचे ते वडील होत.

सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन नोकरीसारख्या ठिकाणी तारेवरची कसरत करताना अनेकांना अनेकविविध संकटांना सामोरे जावे लागते. मात्र, त्यावरही यशस्वीरित्या मात करून आपले कुटुंब आणि आपला संसार सांभाळून बाहेरदेखील मोठ्या मित्रपरिवाराचा ऋणानुबंध निर्माण करून आदर्श व्यक्तीमत्व निर्माण केले. हे अगदी काहीअंशी माणसांनाच शक्य असते. त्यासाठी त्यांना आपले कौशल्यगुण आणि स्वभावनुरूपता वापरावी लागते. तेव्हा हे दिव्य साकार होते.

अशाचप्रकारे समाजात व नातेवाईक आणि मित्रपरिवारात आदराचे स्थान निर्माण करून आणि आपल्या मुलांना उच्चशिक्षण देताना त्यांची घडी बसवून देण्याचे कौशल्य विठ्ठलराव उर्‍हे पाटील यांनी साध्य केले. त्यांचा मनमिळावू नम्र स्वभाव, प्रेमळ वाणी, शिस्तबद्धता या वैशिष्ट्यांमुळे ते आदर्शवत आणि सर्वांच्या आदरास पात्र ठरले.

कै. विठ्ठलराव उर्‍हे पाटील यांनी राहुरी येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यात शेतकी अधिकारी म्हणून सुमारे 35 वर्षे निष्ठेने काम केले. जुन्या पिढीतील एक जाणकार व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्वपरिचित होते. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे, सर्वांप्रतीआदर, वक्तशीर व शिस्तबद्ध स्वभावाने त्यांनी खूप मोठा मित्र परिवार जमविला.

आप्तेष्ट, नातेवाईकांमध्ये त्यांनी आदराच स्थान निर्माण केले होते. सहकारातील नोकरी आणि वडिलोपार्जित जिरायत शेती यामुळे प्रारंभीचा काळ अतिशय कष्टमय होता. त्यांनी यावरही मात करून आपल्या सर्व मुलामुलींना उत्तम शिक्षण तर दिलेच त्याचबरोबर अमूल्य असे संस्कार दिले. आपल्या मुलांना सोन्याचा पिंजरा न देता त्यांना उत्तम संस्कार देऊन स्वातंत्र्याने विहार करण्याची संधी दिली.

याच शिदोरीवर दादासाहेबांनी अभिजीत इंजिनिअर्सची उभारणी करून मावळात उद्योग क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळविला व बाळासाहेब यांनी चिंचवड येथे आपल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायात जम बसवला. त्यांच्या या कुटुंबाने मावळातच नव्हे तर राहुरी तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे, पंतवंडे असा मोठा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.