Talegaon Dabhade : मतदान करणे ही आपली जबाबदारी – प्राचार्य डॉ. संभाजी मलघे

एमपीसी न्यूज – सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदान करणे ही आपली जबाबदारी आहे. ज्या विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले आहे त्यांची मतदार यादीमध्ये नोंद करणे ही प्राध्यापकांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर प्राध्यापकांनी देखील मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. अनेकांना निवडणुकीतील उमेदवार योग्य वाटत नसल्याने ते मतदान करणे टाळतात, तसे न करता अशा वेळी नोटा (NOTA) या पर्यायाचा वापर करा, असे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले.

इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रीय सेवा योजना,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने. ‘राष्ट्रीय मतदार दिन’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी डॉ मलघे बोलत होते.

इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे येथील वरिष्ठ, कनिष्ठ तंत्रशिक्षण महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

डाॅ मलघे पुढे बोलताना म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले आहे त्यांची मतदार यादीमध्ये नोंद करणे ही आपली प्राध्यापकांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर आपणही मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. त्यासाठी निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र शासनाकडून सर्वांना मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाते. अनेक व्यक्तींना निवडणुकीमधील उमेदवार उचित वाटत नाहीत त्यामुळे ते मतदान करण्यास नकार देत होते परंतु निवडणूक आयोगाने आता मतदानामध्ये नोटा(NOTA) हा पर्याय उपलब्ध केल्यामुळे सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा असेही डाॅ. मलघे यांनी सांगितले.

भारतीय घटनेमध्ये मतदानाचा अधिकार हा सर्वश्रेष्ठ अधिकार लोकशाहीमध्ये देण्यात आलेला आहे. असे मत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा राजेंद्र आठवले यांनी कार्यक्रमाप्रसंगी आपल्या मनोगतात मांडले.

राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा मिलिंद खांदवे यांनी शपथ विधीचे वाचन केले. प्रा राजेंद्र आठवले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा अशोक जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.