Maharashtra News : मराठा आरक्षण निवडसूचीतील 1 हजार 64 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देणार

एमपीसी न्यूज – राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या 1 हजार 64 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले.

मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या बाबतीत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, बंदरे आणि खानिकर्म मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन मंत्री शंभूराजे देसाई, विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार अर्जुन खोतकर, माजी खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले, माजी आमदार नरेंद्र पाटील, मराठा मोर्चाचे आबासाहेब पाटील, मराठा आरक्षण कार्यकर्ते विनोद पाटील यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, मराठा आरक्षणासाठी काम करणाऱ्या विविध संघटना आणि मराठा समन्वयक उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, साधारणपणे 2 हजार 185  उमेदवार मराठा आरक्षण घेऊन शासन सेवेत रुजू होणार आहेत.यापैकी 419 उमेदवार शासन सेवेत रुजू झाले आहेत.तर, 1 हजार 64 उमेदवारांना विविध विभागांमध्ये तात्काळ रुजू करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल.या नियुक्त्या करण्याबाबतचा अध्यादेश तातडीने काढण्यात येईल. उर्वरित 702 उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी, तसेच विभाग यांच्यामार्फत विशेष मोहीम घेण्यात येईल.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी सक्षम करणार

येत्या काळात स्थापन करण्यात येणारी उपसमिती मराठा आरक्षण संदर्भातील सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी या संस्थांना सक्षम करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असेही शिंदे यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य शासनाची बाजू अधिक सक्षमपणे मांडण्यासाठी अभ्यास करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.