Maval Crime News : मध्य प्रदेशचे अट्टल दरोडेखोर आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचा थरार; एक पोलीस जखमी

नऊ जणांना अटक

एमपीसी न्यूज – मध्यप्रदेश मधील अट्टल दरोडेखोर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हद्दीतून जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी उर्से टोल नाक्यावर सापळा लावला. त्यावेळी गुन्हेगारांनी थेट पोलिसांच्या अंगावर कार घातली. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी घडली आहे. यामध्ये गुंडा विरोधी पथकातील एक पोलीस गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असून दोघेजण फरार आहेत.

गुंडा विरोधी पथकातील शुभम कदम हे जखमी झाले आहेत. लोकेश चौहान (वय 35), भवानी हनुमंत चौहान (वय 40), निखिल घेकरसिंग गोडन (वय 34), कमलसिंग सुघनसिंग हाडा (वय 61), अंतिम कल्याण सिसोदिया (वय 23), कुंदन चौहान (वय 33), अरविंद चौहान (वय 35), संजय गुदेन (वय 32), बॉबी बबिल धर्मराज झाजा (वय 24, सर्व रा. देवास, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार डोंगरात फरार झाले आहेत.

मध्य प्रदेश येथील अट्टल गुन्हेगार दोन कारमधून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हद्दीतून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जाणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लागलीच उर्से टोलनाक्यावर सापळा लावला. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास दोन कार उर्से टोल नाक्यावरून पुढे जात असताना पोलिसांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालकाने कार न थांबवता थेट पोलिसांच्या अंगावर कार घातली.

शुभम कदम हे जीवाची पर्वा न करता आरोपींच्या कार समोर थांबले. पोलीस समोरून हटत नसल्याचे लक्षात येताच आरोपींनी थेट कदम यांच्या अंगावरून कार चालवली. पोलिसांनी आरोपींच्या कारचा पाठलाग केला. काही अंतरापर्यंत आरोपींनी विरुद्ध दिशेने कार दामटली मात्र पोलीस आपल्या मागावरच असल्याचे लक्षात येताच आरोपींनी कार रस्त्यावर सोडून बाजूच्या डोंगरात पोबारा केला.

या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस दलातील सर्व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उर्से टोल नाक्याकडे धाव घेतली. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे हे देखील स्वतः घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शोधून नऊ आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तर त्यांचे दोन साथीदार अजूनही डोंगरात फरार झाले आहेत. दरम्यान पोलीस कर्मचारी शुभम कदम यांच्या धाडसाचे पोलीस दलातून कौतुक केले जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.