Smart City Project : इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित

एमपीसी न्यूज – इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल (Smart City Project) सिस्टीमच्या सहाय्याने आपत्ती व्यवस्थापन, शासकीय व्यवस्थेपर्यंत सुलभतेने पोहोचता येणे, योग्य वाहतूक नियंत्रण आणि व्यवस्थापन, शहराच्या आरोग्याशी संबंधित परिस्थितीचे यथायोग्य विश्लेषण आणि देखरेख, सुरक्षितता आणि कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे नागरिकांच्या वर्तनामध्ये बदल तसेच शहराचा आत्मनिर्भर आणि बहुआयामी विकास व स्मार्ट सिटी संबंधित घटकांशी संपर्क स्थापित करणे आणि त्यांचे मूल्यमापन करणे शक्य होणार आहे, असे मत स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी व्यक्त केले. 

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या कमांड आणि कंट्रोल सेंटर मार्फत ‘अ’ क्षेत्रिय कार्यालय कार्यक्षेत्रातील स्मार्ट सिटी प्रकल्प 15 ऑगस्ट पासून प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, आनंद भोईटे, सह आयुक्त् आशादेवी दुरगुडे, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मॅनेजिंग डायरेक्टर (इन्फ्रा) अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, उप अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे, अनिता कोटलवार, उज्ज्वला गोडसे यांच्यासह एल अँड टी व टेक महिंद्रा कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

आयसीटीच्या पायाभूत (Smart City Project) सुविधांमध्ये डेटा सेंटर, क्लाऊड, नेटवर्क, सुरक्षा आणि शहरातील विविध सेवांशी जोडले जाण्यासाठी आवश्यक असणारे हार्डवेअर, नागरिक केंद्री सेवा, स्मार्ट सिटी अॅप्स आणि वेब पोर्टल, स्मार्ट सुविधा आणि माहिती देणारे इन्फॉर्मेशन डिस्प्ले या सर्वांचा समावेश आहे. तसेच, या पायाभूत सुविधांमध्ये ऑप्टीकल फायबर, वाय फाय, वायर्ड बस, वायरलेस सेन्सर नेटवर्क्स, 5 जी पर्यंतची कनेक्टीव्हिटी बँडविड्थ आणि लॉंग टर्म इव्होल्युशन नेटवर्क जोडण्यात आले आहे. याबाबत उपस्थितांनी सादरीकरणाद्वारे माहीती जाणून घेतली.

कमांड आणि कंट्रोल सेंटर च्या माध्यमातून अ क्षेत्रिय कार्यालय कार्यक्षेत्रात स्मार्ट सिटी प्रकल्पांद्वारे विविध सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या असून यामध्ये, 8 पीए सिस्टीम, 8 व्हीएमडी, 6 किऑस्क्स, 150 ठिकाणी 292 सीसीटीव्ही, 33 वायफाय, 4 पर्यावरण सेन्सर्स, 2 एटीसीएस, 2 एसटीपी, 1 डब्ल्यूपीएस, 26 घनकचरा वाहने, 1 पार्किंग, 1700 वॉटर मीटर इ. सेवा प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून जुलै 2023 पर्यंत संपूर्ण प्रकल्प शहरामध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहे. एल अँड टी आणि टेक महिंद्रा या दोन्ही कंपन्यांद्वारे स्मार्ट सिटी विकास प्रकल्पांचे कामकाज सूरू आहे.

कमांड आणि कंट्रोल सेंटर हे आपत्तींचे व्यवस्थापन, विसंगत परिस्थितींना प्रतिसाद देण्यासाठी आणि शहरातील विविध ऑपरेशनसाठीचे नियंत्रण केंद्र आहे. त्याद्वारे संपूर्ण कामकाजाचे तटस्थतेने निरीक्षण केले जाणार आहे. डॅशबोर्डच्या माध्यमातून आयसीसीसीमधील प्रत्येक घटकाचे लाईव्ह स्थिती समजण्यात मदत होणार असल्याचे  पाटील यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.