Pune News : विद्युत कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्याला मिटर रूममध्ये कोंडले, एकाला अटक

एमपीसी न्यूज : विज बिल न भरल्यामुळे विद्युत कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याला एका व्यक्तीने मीटर रूममध्येच कोंडल्याचा प्रकार उघडकीस आला. समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका व्यक्तीला अटक केली आहे. 

सलीम बशीर सय्यद (वय 45, रा. सुखनिवास एस आर ए बिल्डींग,  मंगळवार पेठ)  असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महावितरणचे कर्मचारी माधुरी सुनील कुलसुंगे (वय 28) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की,  आरोपी यांच्याकडे 11 हजार 481 रुपये वीजबिल थकले आहे. त्यामुळे फिर्यादी या विद्युत कनेक्शन कट करण्यासाठी मंगळवार पेठेतील आरोपी यांच्या मीटर रूम मध्ये गेल्या होत्या. फिर्यादी यांनी मीटर कट केल्याने आरोपी त्यांच्या अंगावर धावून गेला आणि “आमची कट केलेली लाईट चालू कर नाहीतर मी तुला येथेच रूममध्ये कोंडून ठेवेन” असे म्हणत शिवीगाळ केली आणि मीटर रूमच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून फिर्यादी महिलेला कोंडून ठेवले.

दरम्यान आतमध्ये असलेल्या फिर्यादी यांनी आपल्या कार्यालयातील सहकाऱ्याला फोन करून बोलावून घेतले आणि त्यानंतर त्या बाहेर पडल्या. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.