Bhosari News : ‘मी तुमच्या मुलाचा मित्र आहे, आम्ही दोघे एका ताटात जेवलोय’ असे म्हणत महिलेशी ओळख काढली आणि 70 हजारांचे गंठण पळवले

एमपीसी न्यूज – ‘मी तुमच्या मुलाचा मित्र आहे. आम्ही दोघे एका ताटात जेवलो आहे’. असे म्हणून दोघांनी किराणा दुकानदार वृद्ध महिलेशी ओळख काढली. त्यानंतर महिलेच्या गळ्यात असलेल्या गंठण सारखेच गंठण आपल्या आईला करायचे असल्याचे भासवून 70 हजारांच्या गंठणचा अपहार केला. ही घटना मंगळवारी (दि. 29) सकाळी साडेअकरा वाजता गव्हाणेवस्ती भोसरी येथे भारत माता चौकातील एका किराणा दुकानात घडली.

सुलोचना चंद्रकांत हांडे वय 65, रा. भारत माता चौक, गव्हाणेवस्ती, भोसरी यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हांडे यांचे भारत माता चौकात श्री बालाजी जनरल स्टोअर नावाचे किराणा दुकान आहे. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास एका दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती फिर्यादी यांच्या दुकानात आले. ‘मी तुमच्या मुलाचा मित्र आहे. मी भाजीवाल्याचा मुलगा आहे. आम्ही दोघे एकाच ताटात जेवलो आहोत’. असे म्हणून फिर्यादी यांच्याशी ओळख काढली.

‘मला तुमच्या गळ्यातील गंठण सारखेच गंठण माझ्या आईला करायचे आहे’, असे म्हणून ‘मला तुमच्या गळ्यातील गंठणची डिझाईन पाहायची आहे. जरा गंठण मला दाखवा’. असे म्हणत फिर्यादी यांना त्यांच्या गळ्यातील 70 हजार 600 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण देण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपी गंठण घेऊन पसार झाले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.