Pune News : ‘कंगना जे बोलली ते खरंय, तिच्या मताशी मी सहमत’, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंकडून कंगनाचे समर्थन

एमपीसी न्यूज – एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने ‘‘भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’ असे वक्तव्य केले होते. यावरून देशात मोठा वादंग निर्माण झाला असतानाच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी या वादात उडी घेत कंगनाच्या या विधानाचं समर्थन केलं आहे. ‘कंगना जे बोलली ते खरंय, तिच्या मताशी मी सहमत आहे’, असं अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.

ब्राह्मण महासंघाच्यावतीने 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलतान गोखलेंनी हे विधान केलं आहे.

विक्रम गोखले म्हणाले, खरंय, कंगना रनौत जे म्हणालेली आहे, ते भीक मागूनच मिळालेलं आहे यावर मी सहमत आहे. हे दिलं गेलं आहे बरं का. हे ज्या योद्ध्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले, त्यांना त्यांनी वाचवलं नाही. आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांविरुद्ध उभे राहत आहेत, हे बघून सुद्धा त्यांना फाशीपासून वाचवलं नाही, असेही लोक केंद्रीय राजकारणात होते. भरपूर वाचलेलं आहे मी.

स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी बलिदान दिलं त्यांचा अपमान करणारे हे विधान नाही का? त्या प्रश्नावर बोलताना विक्रम गोखले म्हणाले, ‘आहेच! पण हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की, आपण म्हणजे कोण, तर आपण सरकार देतो. हा आपला अधिकार आहे. आपण सरकारला जाब विचारलाच पाहिजे की, हे तुम्ही हे काय करत आहात?, अशी भूमिका त्यांनी मांडली.

विक्रम गोखले यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुकही केलं आणि शिवसेना व भाजपा एकत्र आली तर बरं होईल, असंही बोलून दाखवलं. गोखले म्हणाले, ‘जे 70 वर्षात झालं नाही ते मोदींनी केलं, पक्षाचे काम सर्व करतात, पण ते देशासाठी मोदी चांगलं काम करतात. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही नव्हतो आणि नसेनही.’

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले नेमकं काय म्हणाले?

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.