Akurdi : प्राधिकरणावरील नियुक्ती रद्द; शहरातील तीनही राज्यमंत्री दर्जाची पदे गेली

राज्य सरकारचा निर्णय

एमपीसी न्यूज – भाजप सरकारने महामंडळांवरील पदाधिकाऱ्यांच्या केलेल्या नियुक्त्या महाविकास आघाडी सरकारने रद्द केल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए)चा देखील समावेश आहे. दरम्यान, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि राज्य लोकलेखा समिती अध्यक्षपदाची नियुक्ती देखील रद्द झाली आहे. त्यामुळे शहरातील तीनही राज्यमंत्री दर्जाची पदे गेली आहेत.

पुणे शहराच्या हद्दीबाहेर पिंपरी – चिंचवड परिसरात औद्योगिक विकास झपाट्याने होत असताना कामगारांना कारखान्याजवळ निवासाची सोय व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली. त्यामुळे पुणे महानगर प्रादेशिक योजनांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 113 (2) अन्वये 14 मार्च 1972 रोजी पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली.

नवनगर उभारणीसाठी जमीन संपादन करणे, संपादित केलेल्या जमिनीचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करणे, विकसित झालेले भूखंड गरजेनुसार निवासी, शैक्षणिक, औद्योगिक, वाणिज्य व सामाजिक कारणांसाठी उपलब्ध करून देणे असा उद्देश निश्चित करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

प्राधिकरणावरील 13 वर्षांपासूनची प्रशासकीय राजवट 2 सप्टेंबर 2018 रोजी उठली. भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची नियुक्ती केली होती. राज्यात पुन्हा आपलेच सरकार येणार, त्यामुळे पुढील पाच वर्षे आपणच महामंडळावरील पदाधिकारी राहणार, अशी आशा मनाशी बाळगून बसलेल्यांना मात्र महाविकास आघाडी सरकारने धक्का दिला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महामंडळावरील जुन्या सरकारने केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये प्राधिकरणाच्या अध्यक्षपद देखील आहे. दरम्यान, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणताही आदेश आला नसल्याचे प्राधिकरण प्रशासनाने सांगितले आहे.

शहरातील तीनही महामंडळे गेली

राज्यात सत्तांतर झाल्याने फडणवीस सरकारने शहरात दिलेली तीन महामंडळे गेली आहेत. ठाकरे सरकारने मागील सरकारने नियुक्त केलेल्या महामंडळावरील नियुक्त्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळावरील अमित गोरखे आणि राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांची नियुक्ती रद्द केल्याने शहरातील तीनही महामंडळे गेली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.