Chinchwad News : विजय बारसे यांच्या सोबत विधिसंघर्षित व झोपडपट्टीमधील मुलांनी घेतला ‘झुंड’चा आस्वाद

एमपीसी न्यूज – वाईट मार्गाने जगत असलेल्या झोपडपट्टी मधील मुलांच्या आयुष्यात स्लम सॉकर / फुटबॉल मुळे कसा बदल येतो या सत्य कथेवर आधारित झुंड चित्रपट सध्या देशभर धुमाकूळ घालत आहे. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे मराठमोळ्या नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शन केले आहे. शनिवारी (दि.19) विजय बारसे यांच्या सोबत पिंपरी चिंचवड मधील विधिसंघर्षित बालकं, झोपडपट्टीतील मुले आणि फुटबॉल खेळाडूंनी चिंचवड येथील एल्प्रो सिटी मॉलमधील आयनॉक्स थिएटर मध्ये झुंड चित्रपटाचा आस्वाद घेतला.

यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश उपस्थित होते. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपट हा झोपडपट्टीतील मुलांवर आधारित आहे. नागपूर येथील सेवानिवृत्त क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देऊन फुटबॉलपट्टू बनविले आहे. झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचे धडे दिले. त्यांच्या कार्यावर आधारित ‘झुंड’ चित्रपट प्रसिद्ध झाला आहे. त्यांची भूमिका महानायक अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे. गुन्हेगारीकडे वळलेली मुले फुटबॉल खेळत-खेळत कशी सुधारली हे चित्रपटात दाखविले आहे. त्या मुलांना फुटबॉलची आवड निर्माण केली.

संदेश बोरडे, ऋषिकेश तपशाळकर, कपीलेश इगवे, आणि सज्जी वर्की यांनी विशेष प्रयत्न करुन विविध मुलांना एकत्र केले व विजय बारसे यांच्या सोबत चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली. 55 ते 60 मुलांनी चित्रपटाचा आस्वाद घेतला. ‘आमच्याच आयुष्यावर आधारित कहाणी पडद्यावर सुरू आहे असं वाटतं होतं. चित्रपट पाहून खूप प्रेरणा मिळाली. आम्ही केलेल्या चुका सुधारून आयुष्यात पुढे जायचं आहे,’ अशी इच्छा चित्रपट पाहून झाल्यावर मुलांनी बोलून दाखवली.

चित्रपट पाहून झाल्यावर विजय बारसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. विजय बारसे म्हणाले, पिंपरी चिंचवड स्लम सॉकरचे काम अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे. या मुलांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. या टिम मधून चांगल्या खेळाडूंची राज्य स्तरावर खेळण्यासाठी निवड करण्यात येईल. तसेच, स्लम सॉकर राष्ट्रीय स्पर्धा पिंपरी चिंचवड येथे व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बारसे म्हणाले.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, ‘दिशा भटकलेल्या मुलांना आणि विधिसंघर्षित बालकांसाठी ही प्रेरणादायी फिल्म आहे. या फिल्ममुळे मुलांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल व्हायला मदत होईल.’

पिंपरी-चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, विशेष बाल पथकाच्या दिपाली शिर्के, संवाद संस्थेचे गजानन कोरडे, गौरव चौधरी, कुंदन कसबे, सुमित जगदाने, अमित शिंदे, आयनॉक्सचे युनिट मॅनेजर सदानंद सावंत यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.