Talegaon Dabhade : ‘स्त्रियांमधील कॅन्सरचे वाढते प्रमाण’ विषयावर तळेगावात जनजागृती कार्यक्रम

एमपीसी न्यूज – महिलांनी तणावमुक्त जीवन जगायला हवे. असे प्रतिपादन तळेगाव जनरल हॉस्पिटल (टीजीएच) ऑकोलाईफ केन्सर सेंटर तळेगावच्या संचालीका व हेड कन्सल्टन्ट डॉ. शिल्पी डोळस यांनी केले. तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्था व टी.जी.एच. ऑकोलाईफ केन्सर सेंटर तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रीयांमधील विविध प्रकारच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण या विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. शिल्पी डोळस बोलत होत्या.

स्त्रियांमधील सध्याच्या धावपळीच्या युगात विविध जबाबदा-या पार पाडताना आपल्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देण्यास वेळ न मिळणे व छोट्या मोठ्या आजाराकडे दुर्लक्ष करणे या गोष्टीचा थेट परिणाम भयंकर रोगात होऊ शकतो याकडे स्त्रिया दुर्लक्ष करतात. स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे सकारात्मक दृष्टी ठेवून जागरूक राहावे यासाठी या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेच्या विश्वस्त निरुपा कानिटकर तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजिका सुनंदा काकडे उपस्थित होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून टी. जी. एच. ऑकोलाईफ केन्सर सेंटर तळेगावच्या संचालीका व हेड कन्सल्टन्ट डॉ. शिल्पी डोळस उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक डाॅ शिल्पी डोळस यांनी महिलांमधील विविध कर्करोग व त्याची माहिती, लक्षणे व उपाय या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच महिलांनी सकस व पोषक आहार, व्यायाम व तणावमुक्त जीवन जगले पाहिजे असा आरोग्य मंत्र उपस्थितीत महिला कर्मचाऱ्यांना दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा निरूपा कानिटकर यांनी या प्रसंगी बोलताना आजच्या धावपळीच्या युगात स्त्रीयांनी स्वतःच्या आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. आपल्या आरोग्यासाठी वेळ देणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन केले. तर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सुनंदा काकडे यांनी या प्रसंगी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना महिलांनी कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे असे नमूद केले.

या कार्यक्रमाला संस्थेतील महिला कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. मुक्ता देशमुख, सूत्रसंचालन प्रा. दीप्ती कनेरीकर यांनी केले. तर आभार प्रा. शैलजा शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आणि कार्यवाहक चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी पाहूण्यांचे स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.