Bhosari : नगरहून पुण्याला झाडू विकण्यासाठी आलेला कारागीर बेपत्ता

एमपीसी न्यूज – अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथून पुण्यात झाडू विकण्यासाठी आत्यासोबत आलेला कारागीर बेपत्ता झाला आहे. भोसरीमधील ळंदी रोड चौकातील पुलाखाली रविवारी (दि. 28) हा प्रकार घडला आहे.

मुकेश रतन आव्हाड (वय अंदाजे 35, रा. घुळेवाडी फाटा, संगमनेर, जि. अहमदनगर) असे बेपत्ता झालेल्या कारागिराचे नाव आहे.

मुकेश यांचा झाडू बनवून विकण्याचा व्यवसाय आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूची देखील पूजा केली जाते. त्यासाठी घरोघरी पारंपारिक झाडू खरेदी केले जातात. मुकेश स्वतः झाडू बनवतात. त्यांनी झाडू बनवून पुण्यात विकण्यासाठी आणले. त्यांच्यासोबत त्यांची आई, चुलते, बहीण आणि भाऊ देखील आले. लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी आणि लक्ष्मी पूजनच्या दिवशी सर्वांनी भोसरी परिसरात झाडू विकले.

सर्व झाडू विकल्यानंतर सर्वजण भोसरीमधील आळंदी रोड चौकातील पुलाखाली बसले. रात्री आठच्या सुमारास मुकेश थोड्या वेळेत परत येतो, म्हणून गेले. रात्री उशिरापर्यंत सर्वांनी मुकेश यांची वाट पाहिली. मात्र, मुकेश आले नाहीत. सर्व झाडू विकले गेल्याने कुणालाही न सांगता ते गावी गेले असल्याचा सर्वांचा समज झाला आणि सर्वजण गावी निघून गेले.

गावी गेल्यानंतर मुकेश गावी पोहोचले नसल्याचे समजले. त्यानंतर, सर्वांनी शोधाशोध सुरु केली. मात्र, त्यांचा कुठेही तपास लागला नाही. शेवटी त्यांच्या नातेवाईकांनी भोसरी पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंदवली. रंग सावळा, केस काळे, उंची सुमारे साडेपाच फूट असे त्यांचे वर्णन आहे. मुकेश यांना दोन मुले आहेत. चार वर्षाचा मुलगा आणि दोन वर्षाची मुलगी आहे. त्यांच्या आई भोसरी परिसरात पायी फिरून प्रत्येक येणा-या जाणा-यास मुकेश यांच्याबाबत विचारत आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.