Mumbai News :  राजकारणाचे गुन्हेगारीकरण करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा- चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. सामुहिक बलात्कारासारख्या घटनांचेही या सत्ताधारी आघाडीला काही वाटत नाही, इतके हे सरकार संवेदनाशून्य झाले आहे. भारतीय जनता पार्टी प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करत असून आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा राष्ट्रीय प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी जी, राष्ट्रीय सरचिटणीस दिलीप सैकिया यांच्यासह पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष आदी नेते एक दिवसाच्या कार्यकारिणी बैठकीत सहभागी झाले होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करणे ही आपली भूमिका आहे. पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करावा म्हणून राज्यात चारशे ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांची आंदोलने झाली. एसटी कामगारांच्या संपात भाजपाचा सक्रीय सहभाग आहे. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर कामगारांचे नेतृत्व करत आहेत.

ते म्हणाले की, सत्ताधारी महाविकास आघाडीने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. जवळ जवळ सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचे नाव जोडले गेले आहे. राज्यात सामुहिक बलात्काराच्या दुःखदायक घटना घडत आहेत पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्याचे काही वाटत नाही.

त्रिपुरात जी घटना घडली नाही तिच्या अफवेवरून मालेगाव, अमरावती, नांदेड येथे दंगली होतात, त्यासाठी पंधरा – वीस हजार लोक रस्त्यावर येतात व पोलिसांवर हल्ला करतात याचीही आघाडीला चिंता नाही. त्यानंतर हिंदूंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली तरीही भाजपावर आरोप करतात. अंमलीपदार्थांचे समर्थन केले जाते आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी स्थिती झाली असताना आपल्याला संघर्ष चालू ठेवायचा आहे, असे पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.