Chandrakant Patil : कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा कोर्स पूर्ण होईपर्यंतची फी भरणार!

एमपीसी न्यूज : कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा आता जो कोर्स (अभ्यासक्रम) आहे (उदा. मेडीकल, इंजिनिअरींग किंवा इतर कोणताही) तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत पूर्ण शुल्क राज्यशासन भरेल. तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत फी सरकारच्या वतीने भरली जाईल. त्यासाठी कोणताही वेगळा निर्णय करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना दिली.
कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णयाबद्दल शासनाने कोणती कार्यवाही केली. याबाबत विधानसभा सदस्य शिरीष चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण फी माफ करण्याबाबत सर्व अकृषी विद्यापीठांना निर्देश देण्यात आलेले आहेत. आतापर्यंत 931 पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी, 200 पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी आणि 228 पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी यांना 2 कोटी 76 लाख 84 हजार 222 रक्कम वितरीत करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री पाटील यांनी विधानसभेत दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.