Chinchwad News : भटक्या विमुक्तांचे संसार उभे राहण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांचा हा ‘पद्मश्री’ – गिरीश प्रभुणे

ह. भ. प. डॉ. नारायणमहाराज जाधव यांच्या हस्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा नागरी सत्कार

एमपीसी न्यूज – ‘भटक्या विमुक्तांचे संसार उभे राहण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचा हा खरा ‘पद्मश्री’ आहे.’ असे उद्गार भटके विमुक्त, पारधी समाजासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देऊन कार्य करीत असलेले गिरीश प्रभुणे यांनी काढले.

शहरातील 31 विविध संस्थांच्या वतीने स्थापन केलेल्या गौरव समितीच्या वतीने गिरीश प्रभुणे यांचा ह. भ. प. डॉ. नारायणमहाराज जाधव यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंतर सत्काराला उत्तर देताना गिरीश प्रभुणे बोलत होते. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आज (मंगळवारी, दि.23) हा सत्कार सोहळा पार पडला.

कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून ह.भ.प. डॉ. नारायणमहाराज जाधव उपस्थित होते. महापौर उषा ढोरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यासह अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे व इतर मान्यवर उपस्थित होते.

गिरीश प्रभुणे म्हणाले, ‘पिंपरी चिंचवडमध्ये माझ्यासाठी सन्मानाचे प्रसंग फार कमी आहेत. एक काळ असा होता की उसणे साहित्य आणून उदरनिर्वाह सुरू होता, शहरातील सर्वच पंधरा बॅंकांमध्ये आमचे कर्ज झाले होते. ब-याच वेळा मारहाण सोसावी लागली, कधी प्राणघातक हल्ले झाले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला आणि समरसता गुरुकुलमचे काम सुरू झाले.’

‘भटक्या विमुक्तांचे संसार उभे राहण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचा हा खरा पद्मश्री आहे. या सगळ्या कार्यात माझ्या पत्नीचा त्याग मोठा आहे, तिच्या काटकसर आणि अखंड सोबतीचा परिपाक म्हणजे हा पद्मश्री. हा पुरस्कार म्हणजे मी एकटा नव्हे माझ्या मागे असंख्य हात राबतात हे तितकेच महत्त्वाचे आहेत. अनेकांनी येथून बाहेर गेल्यावर आकाशाला गवसणी घातली,’ असे गिरीश प्रभुणे म्हणाले.

यावेळी महापौर उषा ढोरे आणि नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी मनोगत व्यक्त केले. ‘पिंपरी चिंचवड शहराला नावलौकिक मिळवून देण्यात गिरीश प्रभुणे यांचा हातभार आहे. त्यांना मिळालेला सर्वोच्च पुरस्कार हा फक्त त्यांचा नव्हे तर शहराचा नावलौकिक वाढवणारा आहे,’ असे विचार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून ह.भ.प. डॉ. नारायणमहाराज जाधव यांनी गिरीश प्रभुणे यांच्या कार्याचा आढावा घेत, पुरस्कारासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीकांत चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद (भोसरी शाखा), महाराष्ट्र साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा), महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य-कला अकादमी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा), लायन्स क्लब भोजापूर गोल्ड, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, कलारंग प्रतिष्ठान, बंधुता प्रतिष्ठान, शब्दधन काव्यमंच, अक्षरभारती, समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा), भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान, स्वयंसिद्धा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, साहित्य संवर्धन समिती पिंपरी-चिंचवड, दिलासा संस्था, पिंपरी-चिंचवड साहित्य मंच, गुणवंत कामगार विकास समिती, पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती, गझलपुष्प पिंपरी-चिंचवड, सावित्रीच्या लेकींचा मंच, भूगोल फाउंडेशन (भोसरी), स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड), शिक्षकमित्र जिव्हाळा परिवार (भोसरी), ज्येष्ठ नागरिक संघ (चिंचवडगाव), एल्गार साहित्य परिषद, आशिया मानवशक्ती विकास संस्था, कष्टकरी संघर्ष महासंघ, स्वानंद महिला संस्था (पिंपरी-चिंचवड) या एकतीस संस्थांच्या वतीने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा कृतज्ञता नागरी सत्कार करण्यात आला आहे.

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले आणि महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

प्रा. दिगंबर ढोकळे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. सतीश गोरडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.