Chinchwad News : नो पार्किंगबाबत व्यवस्थित माहिती द्या, मग वाहने टो करा, नागरिकांची माफक अपेक्षा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अनेक ठिकाणी पे अँड पार्क हे धोरण अवलंबिले गेले आहे. तसेच ठिकठिकाणी नो पार्किंग देखील करण्यात आले आहे. मात्र नो पार्किंगचे बोर्ड दिसेनासे झाल्याने नागरिक वाहने पार्क करतात आणि नो पार्किंगमध्ये वाहन पार्क केल्याच्या कारणावरून पोलीस यंत्रणांकडून वाहने टो केली जातात. असा अनुभव काही ठिकाणी शहरात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने व्यवस्थित सूचना द्याव्यात, स्पष्ट बोर्ड लावावेत, पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी त्यानंतर कारवाई करावी, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख रस्त्यांवर पार्किंग पॉलिसी राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार ठीकठिकाणी ‘पे अँड पार्क’ देखील सुरू करण्यात आले आहेत. मात्र बेशिस्त वाहन चालकांमुळे पे अँड पार्क योजनेचा फज्जा उडाला होता. पोलिसांनी बेशिस्त वाहनांवर कारवाई करावी असे पालिकेचे म्हणणे होते. मात्र पोलिसांकडे वाहने टो करण्यासाठी टोइंग वाहने उपलब्ध नव्हती. पोलिसांची अडचण लक्षात घेत पालिकेने पोलिसांना टोइंग व्हॅन उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर 25 मार्च पासून या कारवाईला सुरुवात झाली.

 

एखादी दुचाकी नो पार्किंगमध्ये उभी असेल तर तिच्यावर 500 रुपयांचा दंड आकारला जातो. ती दुचाकी पोलिसांनी टो केली तर टोइंग चार्जेस 200 रुपये आणि जीएसटीची रक्कम 36 रुपये असा एकूण 736 रुपयांचा भलामोठा दंड दुचाकीवर येतो.

सध्या टोइंगची कारवाई पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सांगवी, वाकड, पिंपरी, चिंचवड आणि निगडी वाहतूक विभागात सुरु आहे. मागील एक महिन्यात दोन हजार 141 वाहने टो करण्यात आली आहेत. या वाहनांवर पाच लाख 63 हजार 568 रुपये दंड आकारला गेला आहे. सांगवी वाहतूक विभागात 543, वाकड वाहतूक विभागात 465, पिंपरी वाहतूक विभागात 503, चिंचवड वाहतूक विभागात 376 आणि निगडी वाहतूक विभागात 254 वाहने मागील एक महिन्यात टो केली आहेत.

नागरिकांचा या टोइंग कारवाईला विरोध नाही. मात्र पे अँड पार्क केलेल्या ठिकाणी व्यवस्थित बोर्ड नाहीत. लावलेले बोर्ड अज्ञातांकडून काढले गेले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये वाहन पार्किंगबाबत संभ्रम निर्माण होत आहे. बोर्ड लावलेल्या ठिकाणापासून किती अंतरापर्यंत नो पार्किंग आहे, याबाबत अनेक ठिकाणी स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. वाहन टो केल्यानंतर टो केलेल्या वाहनाच्या जागी वाहनावर कारवाई केल्याबाबत आणि संबंधित वाहन धारकाने कुठे संपर्क करावा याबाबत सूचना लिहिणे आवश्यक असते. मात्र टोइंग करताना अशा प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. वाहन टो करताना केवळ व्हिडीओ काढला जातो आणि वाहन उचलून नेले जात आहे. अशा परिस्थितीत वाहन वाहतूक विभागाने टो केले आहे अथवा चोरीला गेले आहे, याबाबत नागरिक संभ्रमात पडत आहेत.

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे म्हणाले, “टोइंग कारवाई सध्या पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत पाच विभागात सुरु आहे. ही कारवाई सरसकट सगळीकडे केली जात नाही. ज्या ठिकाणी नो पार्किंग, पेड पार्किंगची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी नियम मोडणा-या वाहनांवर कारवाई केली जात आहे.

ही कारवाई पहिल्या टप्प्यात आहे. त्यामुळे सुरुवातीला अनाउंसिंग केले जाते. संबंधित वाहन धारक व्यक्ती आली नाही तर वाहन टो केले जाते. लोकांमध्ये जागरूकता येईपर्यंत सूचना दिल्या जातील. वाहन टो केल्यानंतर सूचना लिहिली जात नसेल तर त्याबाबत संबंधितांकडून माहिती मागवून योग्य त्या सूचना देण्यात येतील, असेही उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.