Chinchwad News: शहरात चोरीच्या सहा घटनांमध्ये 13 लाख 40 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या घटना वाढतच आहेत. मंगळवारी (दि. 1) तीन वाहन चोरी, एक घरफोडी आणि दोन अन्य चोरीचे गुन्हे गुन्हे निगडी, चाकण, पिंपरी, वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. चोरीच्या या सहा घटनांमध्ये 13 लाख 40 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

आकुर्डी येथील आयटीआय शिक्षण संस्थेत अज्ञात चोरटयांनी चोरी केली. टेरेसवरील खिडकीचे लोखंडी गज कापून चोरट्यांनी आयटीआयच्या वर्कशॉपमध्ये प्रवेश केला. गरम व गार पाण्याचे मिक्सर, नळ बंद करण्याचे स्टॉप क्लॉक, नळ, वॉश बेसिन, तांब्याची वेल्डिंग केबल, तांब्याचे पाईप, गॅस वेल्डिंग मशीन असा एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. आयटीआय शिक्षक अशोक शरणाप्पा मोरे (वय 55, रा. पिंपळे गुरव) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अभिषेक हेमंत लेंडघर (वय 20, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा 12 लाख रुपये किमतीचा मिनीटिपर अज्ञात चोरट्यांनी दावडमळा फाटा चाकण येथून चोरून नेला. गुलाब अब्दुल करीम शेख (वय 42, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड येथील ए वन विस्टा सोसायटीच्या पार्किंग मधून फिर्यादीची 15 हजारांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली आहे. अविनाश विलास देशमुख (वय 28, रा. एनडीए रोड, शिवणे) यांची देखील 30 हजारांची दुचाकी थेरगाव येथील पंडित पेट्रोल पंपाजवळून चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत देशमुख यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राजेश रामकवल यादव (वय 39, रा. जाधववाडी, चिखली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी चिंचवड मधील बलवंत इंडस्ट्रीज या कंपनीतून नीलम रवी देशमुख (वय 22, रा. रुपीनगर, निगडी) या महिलेने 29 हजार 400 रुपये किमतीचे तांब्याचे रॉ मटेरियल चोरून नेले. याबाबत नीलम देशमुख या कामगार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेलपिंपळगाव येथील भीमा नदीच्या बंधा-या जवळ ठेवलेले 35 हजारांचे गंजलेले व खराब झालेले लोखंडी ढापे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार 31 जानेवारी रोजी उघडकीस आला. याप्रकरणी रवींद्र सांडभोर (वय 53, रा. गवारेवस्ती, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.