Nigdi News : निगडी स्मशानभूमीतील विविध विकास कामाला सुरूवात; नागरिकांची गैरसोय टळणार

एमपीसी न्यूज – गेली अनेक महिने निगडी स्मशानभूमीतील विद्युत दाहीनी व स्थापत्य विकास कामे करण्यासाठी आयुक्तांकडे स्थानिक नगरसेवक उत्तम केंदळे, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका कमला घोलप, नगरसेविका सुमन पवळे वारंवार पाठपुरावा करत होते. त्याला अखेर यश आले असून स्मशानभूमीतील विकास कामांना सुरुवात झाली आहे.

महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधील निगडी स्मशानभूमी येथे मागील दोन वर्षांपूर्वी एक नवीन विद्युत दाहिनी बसवण्यात आली होती. निगडी स्मशानभूमी अंतर्गत निगडी, यमुनानगर, मोरेवस्ती, आकुर्डी, तळवडे, त्रिवेणीनगर, रुपीनगर, कृष्णानगर संभाजीनगर, प्राधिकरण आदि भागातून नागरिक अंत्यविधीसाठी स्मशानभूमी मध्ये ये जा करत असतात. जास्त लोकसंख्या असल्याने या भागातील मृत्यू दरही त्या प्रमाणात आहे.

निगडी स्मशानभूमीत 18 वर्ष जुनी विद्युत दाहिनी आहे. ती काढून टाकून त्या ठिकाणी नवीन विद्युत दाहिनी बसवण्यात येणार आहे. कल्याणी इंटरप्राईजेस 72 लाखाची विद्युत दाहिनी बसवण्याचे काम करणार आहे. 4 कोटी 11 लाखाचे स्थापत्य विषयक व विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत.

नवीन विद्युत दाहिनी बसविण्याचा व स्थापत्य विषयक कामासाठी तसेच लेखाशिर्ष व स्मशानभूमीच्या कामासाठी निधीची तरतुद उपलब्ध करुन देण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी पाठपुरावा केला. स्मशानभूमीत विविध जातींचे लोक अंत्यविधीसाठी येतात त्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध होणार असून 20 वर्षापासून धूळ खात पडलेल्या निगडी स्मशानभूमीचा चेहरा मोहरा बदलणार आहे अशी माहिती नगरसेवक उत्तम केंदळे यांनी दिली आहे.

नगरसेवक सचिन चिखले म्हणाले, “मागील तीस वर्षांपूर्वी कै महापौर मधुकर पवळे यांच्यामार्फत विद्युत दाहिनी बसवण्यात आली होती. ती विद्युत दाहिनी कधीही बंद पडत होती. मृतदेह पूर्ण जळत नव्हते. अनेक अडचणीचा सामना आम्हाला व कर्मचाऱ्यांना करावा लागत होता. अनेक लोकांचे फोन येत होते. विद्युत दाहिनी बाबत अनेक दिवसापासून महानगरपालिकेकडे पाठपुरावा चालू होता त्यानिमित्ताने आज नवीन विद्युत दाहीनीचे काम चालू करण्यात आले. मागील वर्षी एक नवीन विद्युत दाहिनी बसवण्यात आली आहे. कालांतराने अजून एक नवीन गॅस दाहिनी बसवण्यात येणार आहे. त्यामुळे या विद्युत दाहिनी वरील लोड कमी होईल.”

स्मशानभूमी मधील कामांचा कायमचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे नागरीकांचा त्रास कमी होईल. अनेक स्थापत्य विकास कामे, शौचालय, प्रतीक्षा शेड, हवा प्रदूषण नियंत्रण संच, सीमाभिंत, सुरक्षा रक्षक खोली इत्यादी कामे व विद्युतविषयक कामे करणे गरजेचे होते. लवकरच ही सर्व कामे पूर्ण होतील, असे नगरसेवक उत्तम केंदळे यांनी सांगितले.

नगरसेविका कमला घोलप म्हणाल्या, “मृतांच्या नातेवाइकांना स्मशानभुमी येथे बसण्यासाठी व इतर सुविधा येणाऱ्या काळात उपलब्ध करण्यात येतील.

नगरसेविका सुमन पवळे म्हणाल्या, ‘प्रभाग क्रमांक 13 मध्ये लोकसंख्या जास्त आहे. त्याच प्रमाणात मृत्युदरही असतो. त्यामुळे नागरिकांना स्मशानभूमी सुसज्ज झाल्याचा फायदा होणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.