Bhosari News: भोसरीत विजेचा खेळखंडोबा, नगरसेवक रवि लांडगे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना साकडे; अजितदादांनी अधिकाऱ्याला जागेवरच फोन लावून दिले हे आदेश

एमपीसी न्यूज: भोसरी परिसरात वारंवार होणाऱ्या खंडीत वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे भोसरीला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यासाठी बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना साकडे घातले आहे. यासंदर्भात रवि लांडगे यांनी शुक्रवारी (दि. १०) अजित पवार यांना निवेदन दिले. त्यानंतर अजित पवार यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्याला तातडीने फोन करून भोसरीकरांची विजेची समस्या सोडवण्याचे आदेश दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी शुक्रवारी पिंपळेगुरवमध्ये प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन भोसरीतील चक्रपाणी वसाहत, मोहननगर, धावडेवस्ती, भगतवस्ती व परिसराला भेडसावणाऱ्या विजेच्या समस्येबाबत निवेदन दिले. यावेळी नगरसेवक अजित गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते संजय उदावंत उपस्थित होते. भोसरीतील विजेची समस्या सुटावी म्हणून भोसरीकरांनी महावितरणवर विराट मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र जमावबंदीचा आदेश लागू असल्यामुळे पोलिसांनी केलेल्या विनंतीला मान देऊन मोर्चासाठी जमलेले हजारो नागरीक माघारी परतल्याचे रवि लांडगे यांनी अजित पवार यांना सांगितले. त्यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज समस्या सोडवण्यासाठी जुने मिनी बॉक्स व ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्याचे आश्वासन मोर्चाच्या शिष्टमंडळाला दिले होते. या आश्वासनावर महावितरणकडून संथपणे कार्यवाही सुरू असल्याकडे रवि लांडगे यांनी अजित पवार यांचे लक्ष वेधले.

रवि लांडगे यांनी दिलेले निवेदन स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी महावितरणच्या भोसरीतील संबंधित अधिकाऱ्याला जागेवरच फोन लावला. भोसरीच्या भागात वारंवार वीजपुरवठा खंडीत का होतो, अशी विचारणा त्या अधिकाऱ्याला केली. नागरिकांनी मागणी केल्यानंतर दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यास वेळ का लागतो?, असा सवालही अजित पवार यांनी त्या अधिकाऱ्याला केला. भोसरी आणि परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असेल तर त्यावर कायमचा उपाय करून वीजपुरवठा सुरळित करा. जुने मिनी बॉक्स व ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवायची असेल तर तातडीने अंमलबजावणी करा. नागरिकांची पुन्हा तक्रार येता कामा नये, असे आदेश अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्याला दिल्याचे बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.