Chakan Crime News : सहा वर्षांपूर्वीचे खून प्रकरण! खुनाच्या आरोपातून १२ जणांची निर्दोष मुक्तता

एमपीसी न्यूज : चाकण मध्ये सहा वर्षांपूर्वी म्हणजे १ जून २०१५ रोजी झालेल्या थरारक हत्या प्रकरणात गोळ्या घालून खून केल्याचा आरोपातून बारा जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तपासात झालेल्या त्रुटी, आरोपींची ओळख परेड या मुद्यांवर खेड सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

आबा उर्फ ज्ञानेश्‍वर तांदळे, श्रीधर पवार, नीलेश पिल्ले, शशिकांत जगताप, स्वप्नील बोकड, सतीश पाटील, संतोषकुमार साह, रोहित पवार, चंद्रकांत मराठे, संतोष जांभळे, राजा गुप्ता आणि मंजय साह अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत.

१ जून २०१५ रोजी सकाळी अकराच्या सुमारास रोहन राजेंद्र भूरूक ( वय २८ ) यांची चाकण येथील मुटकेवाडी मधील पोलाईट हेरीटेज इमारतीच्या पार्किंग मध्ये दोन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. जुन्या भांडणातून व जमिनीच्या वादातून हा गोळीबार करून हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणी खून झालेले रोहन यांची पत्नी प्रियंका रोहन भूरूक (वय २७) यांच्या फिर्यादीवरून चाकण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता . बड्या राजकीय कुटुंबाशी संबंधित व्यक्ती यामध्ये मुख्य संशयित आरोपी असल्याने या घटनेने संपूर्ण मध्ये एकाच खळबळ उडाली होती.

दरम्यान सहा वर्षांनी या खुनाच्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. यामध्ये सरकारी पक्षाकडून ३२ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तपासात झालेल्या त्रुटी, आरोपींची ओळख परेड या मुद्यांवर खेड सत्र न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून हा आदेश दिला आहे. त्यामुळे खून केल्याचा आरोपातून बारा जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.